मध्य प्रदेश,
Khandwa खंडवा जिल्ह्यातील रतागड येथील बाल संप्रेषण गृहातून सहा अल्पवयीन आरोपी भिंत फोडून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री घडलेली ही घटना उघडकीस येताच संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच अपर जिल्हाधिकारी कांशीराम बडोले, शहर पोलीस अधीक्षक आणि कोतवाली पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू केली असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

प्राथमिक तपासात उघड झाले आहे की, या अल्पवयीनांनी बाल सुधारगृहाच्या बाथरूमची भिंत तोडून आवारात प्रवेश केला आणि त्यानंतर मुख्य भिंतीवरून उडी मारून पलायन केले. हे सर्व आरोपी चोरी, मुलींचे अपहरण आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले होते. या घटनेनंतर बाल सुधारगृह प्रशासनाची निष्काळजीपणा आणि सुरक्षेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.विशेष म्हणजे, यापूर्वी १७-१८ मे रोजीही अशाच प्रकारे पाच अल्पवयीन आरोपी बाल सुधारगृहातून फरार झाले होते. त्यामुळे वर्षातील ही दुसरी घटना असतानाही सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावेळी झालेल्या सुरक्षाविषयक त्रुटींची जबाबदारी निश्चित करत, प्रशासनाने दोन होमगार्ड कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही, ही कारवाई पुरेशी नाही, असे अनेक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मानत आहेत. बाल सुधारगृहात बंद असलेल्या या आरोपींना पूर्णपणे स्वतंत्र आणि सुरक्षित वातावरणात ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असून त्यामध्ये झालेल्या चुका गंभीर मानल्या जात आहेत.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी धाडसत्र राबवत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने या घटनेनंतर बाल सुधारगृहाची सुरक्षा वाढवली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्याचे संकेत दिले आहेत.अपर जिल्हाधिकारी कांशीराम बडोले यांनी सांगितले की, “घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, या सहा बाल अपचारांवर वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्या शोधासाठी स्वतंत्र पथके कार्यरत आहेत आणि लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.”या प्रकरणामुळे खंडवा जिल्ह्यातील बाल सुधारगृहाच्या सुरक्षेवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कडक उपाययोजना अपेक्षित आहेत.