...तरीही पाटबंधारे विभागाला पाझर फुटेना

पंधरवाडा लोटूनही कालवा दुरुस्तीकडे दुर्लक्ष

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
गोंदिया,
Khulbanda reservoir यंदाच्या हंगामात मराठवाडा व इतर भागात पावसाने अतोनात नुकसान केले. जिल्ह्यात या पावसाचा फटका पडला नसला तरी जिल्ह्यातील अनेक भागात शेतकर्‍यांना नुकसानीला समोर जावे लागले. त्यातच २६ सप्टेंबर रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील खळबंदा जलाशयाच्या कालवा, जो सेजगाव, परसवाडा, अर्जुनीला जातो. तो फुटला. मात्र पंधरवाडा लोटूनही पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष केल्याने अद्यापही कालव्याची दुरुस्ती झाली नाही, परिणामी भारी जातीच्या धानाला लागणारा पाणी त्या गावापर्यंत जाणार नसल्याने हाती आलेले पीक पाटबंधारे विभागाच्या आशिर्वादाने नेस्तनाबूत होणार आहे.
 
 

Khulbanda reservoir canal damage 
तालुक्यातील खळबंदा जलाशयातून जवळपास ५० ते ६० गावांना सिंचनाची सोय खरीप व रब्बी हंगामात होते.
खळबंदा जलाशयाच्या माध्यमातून सेजगाव, अर्जुनी, परसवाडा तसेच परिसरातील गावांना पाणी जातो, तो कालवा सेजगाव ते खळबंदाच्या मधातून २६ सप्टेंबर रोजी फुटला. हा कालवा फुटल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले. दुसरीकडे जोपर्यत हा कालवा दुरूस्त होणार नाही, तोपर्यत शेतकर्‍यांना पुढील सिंचनासाठी तत्काळत बसावे लागणार आहे. या बाबीला आज पंधरवाडा लोटत चालला आहे. मात्र या काळात कालवा दुरुस्तीसाठी कोणतीही उपाययोजना झाली नसल्याने भारी जातीच्या धानाला या खळबंदा जलाशयाच्या माध्यमातून मिळणारा पाणी शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत पोहचू शकणार नाही. अनेक शेतकर्‍यांनी खळबंदा जलाशयाचे कार्यालया गाठून व्यथा मांडली. मात्र पाटबंधारे विभागातील एकही अधिकारी, कर्मचार्‍याला पाझर फुटला नाही. एकदरीत एकदंरीत पाटबंधारे विभागातील अतिकर्तव्यदक्ष अधिकार्‍यांच्या आशिर्वादानेच शेतकर्‍यांचे हाती आलेले धान पीक निसटणार आहेत. तर दुसरीकडे क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनीही ८ ऑक्टोबर रोजी फुटलेल्या कालव्याला भेट देवून संबंधित विभागातील अधिकार्‍यांची चर्चा केली मात्र ती चर्चा ही निष्फळ ठरल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसातच धान पिकाला पाणी लागणार आहे. मात्र कालव्याची दुरुस्ती झाली नसल्याने जलाशयात पाणी राहूनही शेतकर्‍यांना उपासी रहावे लागणार आहे.
 
 
विभागातील अधिकारी बेजबाबदार
 
 
खळबंदा जलाशयाची डागडुजी व देखभाल दुरूस्ती पाटबंधारे विभाग गोंदियाच्या खांद्यावर आहे. त्या विभागातील शाखा अभियंता मगर हे प्रशिक्षणावर गेले आहेत. यांचा कार्यभार अभियंता भोये यांच्याकडे आहे. तर उपविभागीय अभियंता निकम यांच्याकडेही संबंधित विभागाचा डोलारा आहे. मात्र या एकाही अधिकार्‍यांकडून कालव्याची दुरुस्ती करून शेतकर्‍यांना सिंचनाची सोय कशी उपलब्ध करता येईल, याची उपाययोजना तयार केली नसल्याने नुकसान अटळ आहे.
सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्राचे होणार नुकसान
तालुक्यातील खळबंदा जलाशयाच्या कालवा फुटला त्या कालव्याच्या माध्यमातून कारुटोला, अत्री, गोमाटोला, सेजगाव, बोदा, गोंडमोहाडी, सोनेगाव, बेरडीपार, डब्बेटोला, परसवाडा, बोरा, बघोली, किडंगीपार, अर्जुनी या गावातील शेतकर्‍यांना सिंचनाची सोय होते. त्यातच भारी जातीच्या धानाला येत्या काही दिवसात पाण्याची नितांत आवश्यात आहे. परंतु कालवा नादुरुस्ती असल्याने जवळपास १० हजार हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे पाटबंधारे विभागाच्या आशिर्वादाने नुकसान होणार आहे.

कालवा त्वरित दुरुस्त करण्याची मागणी
जशालयाचा कालावा फुटला याला अधिकारी व कर्मचारी कारणीभूत असल्याची,संतप्त प्रतिक्रिया शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, पाणी आकारणी कर व इतर बाबींसाठी विभागाचे कर्मचारी व अधिकारी शेतकर्‍यांना त्रास देतात. मात्र झालेला प्रकार हा विभागाचा नाकर्तेपणा असल्याचे उघड झाले आहे. तेव्हा हा कालवा त्वरित दुरुस्त करून शेतकर्‍याना न्याय द्यावा, अशी मागणी सेजगार येथील शेतकरी जितेंद्र भैय्यालाल बिसेन, महेंद्र पारधी यांच्यासह बाधित गावातील शेतकर्‍यांनी केली आहे. तसेच मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलनात्मक भूमिका घेण्याचाही माणस शेतकर्‍यांनी तयार केला.