वर्धा,
Ravindra Shobhane मराठी भाषा फार पुरातन काळापासून जन्माला आली आहे. या भाषेची महान ज्ञानपरंपरा आणि प्राचीन संस्कृती आहे. आजच्या काळात जगामध्ये ज्ञानविज्ञानाचे क्षेत्र विस्तीर्ण होत असताना मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून जगातील ज्ञानवृद्धीची संकल्पना प्रत्यक्ष लिखित स्वरूपात कार्यान्वित केली जात आहे.
इतर अनेक भाषांमध्ये त्यांची संस्कृती काटेकोरपणे जपली जाते; या संस्कृतीविषयी गर्व बाळगला जातो. आपल्यामधील अनेक लोक मराठीविषयी न्यूनगंड बाळगतात. मराठी भाषेचा विकास करायचा असेल तर मराठी भाषिक असल्याचा अभिमान जागृत ठेवा असे आवाहन अमळनेर येथे भरलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ व स्थानिक यशवंत महाविद्यालय यांच्या संयुत विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महिला अभ्यास केंद्राचे सहायक प्राध्यापक डॉ. भगवान फाळके, प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद नारायणे, विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी गोहणे उपस्थित होते.
डॉ. शोभणे पुढे म्हणाले, मराठी विश्वकोश निर्मिती हा कधी न संपणारा मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे मराठी भाषेतून ज्ञानाचा प्रसार केला जात आहे. या ज्ञानमालिकेत आपणही सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.डॉ. भगवान फाळके यांनी मराठी भाषेचा प्राचीन वारसा आणि वर्तमानातील भाषेचे स्थिती विशद केली. प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे यांनी मराठी विश्वकोशाच्या कार्याची व्यापकता आणि मराठी जनमाणसांमधील त्याची उपयुक्तता विशद केली. डॉ. प्रमोद नारायणे यांनी प्रास्तावक केले. संचालन राखी राठोड हिने केले तर आभार वैष्णवी गोहणे हिने मानले.