नागपूर,
Kalpana Pandey : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर गणित विभाग आणि गणित अभ्यास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘गणित विषयातील क्षेत्र प्रकल्पांची ओळख’ या विषयावर कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत विद्यापीठ शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांनी विद्यार्थ्यांसाठी अनुभवी शिक्षक हे ज्ञानसंपदा असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला डॉ. सुभाष ताडे, डॉ. कल्पना पवार, डॉ. गणेश केदार, डॉ. सुजाता जनार्दन उपस्थित होते. डॉ. पांडे यांनी सांगितले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार नागपूर विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम तयार केला आहे. जपान, अमेरिका आणि युरोपमधील शिक्षणपद्धतीशी त्याचे साधर्म्य असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे म्हटले की, AI मध्ये भावना नसल्याने संभाव्यता काढण्याची क्षमता नाही, ही शिक्षकांमध्येच आहे, त्यामुळे भविष्याभिमुख अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. वैदिक गणितासारख्या भारतीय ज्ञानपरंपरेतील विषयांचे अद्ययावत रूपांतर करून अभ्यासक्रमात समावेश करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. सुभाष ताडे, प्राचार्य डॉ. पराग निमजे आणि डॉ. कल्पना पवार यांनी गणित क्षेत्र प्रकल्पाच्या मूल्यमापन पद्धती, गुणवाटप आणि रचना यावर सादरीकरण केले. डॉ. गणेश केदार यांनी संशोधन प्रकल्प कसा तयार करावा याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन सुधा राणी यांनी केले आणि आभार डॉ. कल्पना पवार यांनी मानले. कार्यशाळेला गणित विषयाचे शिक्षक आणि अभ्यास मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.