सामूहिक विद्यापीठ गीत गायनातून वाहणार विश्वविक्रमी आदरांजली

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी कार्यक्रम शनिवारी

    दिनांक :09-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ५७ व्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने 'या भारतात बंधुभाव नित्य वसु दे...' या सामूहिक विद्यापीठ गीत गायनातून विश्वविक्रमी आदरांजली अर्पण केली जाणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वविक्रमी सामूहिक विद्यापीठ गीत गायनाचा कार्यक्रम शनिवार, दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८.३० वाजता विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाजवळील मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुप्रसिद्ध हास्य अभिनेता भारत गणेशपुरे, सन्मान अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, विश्वविक्रम समिती, विद्यापीठाशी संबंधित सर्व सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता अंबाझरी मार्गावरील प्रवेशद्वारातून प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
 

Nagpur University 
 
 
असा मिळेल प्रवेश
राष्ट्रसंतांना सामूहिक विद्यापीठ गीत गायनातून आदरांजली अर्पण करण्याकरिता आलेल्या विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व नागरीकांना https://yuvabharti.in/rtmnu/ या लिंकवर नोंदणी केल्यानंतर प्राप्त झालेल्या एन्ट्री पास वर असलेल्या गेटवरून प्रवेश मिळणार आहे. एन्ट्री पास वरील क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थी शिक्षक कर्मचारी व नागरिकांना प्रवेश मिळणार असून त्यानंतर डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.
पार्किंग व्यवस्था
कार्यक्रमाकरिता सहभागी होण्याकरिता आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसेस आणि कारची पार्किंग व्यवस्था अंबाझरी मार्गावरील कुलगुरू निवासस्थाना जवळील मैदानावर करण्यात आली आहे. या सोबतच विद्यापीठाचे वसतिगृह, गुरुनानक भवन परिसर, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन येथे दुचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.