नागपूर,
Patrabhet Bhargavbhumi ‘पत्रभेट भेट सद्गुरूंशी’ च्यावतीने 25 वर्षांच्या ज्ञानदान प्रवासाचा सुवर्णक्षण साजरा करण्यासाठी शनिवारी 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 5.30 वाजता, ब्राह्मण सहाय्यक संघ, वीरेश्वर मंदिराजवळ, मुख्य बस स्थानकाच्या मागे, तालुका-चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे दिवाळी विशेषांकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला श्री गुरू मंदिर, नागपूरचे दत्त संप्रदायातील अधिकारी सत्पुरुष, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक, सुप्रसिद्ध लेखक व प्रबोधनकार धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. अध्यक्षस्थानी माणगाव संस्थानचे माजी अध्यक्ष वैद्य रामचंद्र जनार्दन गणपत्ये, प्रमुख पाहुणे चिपळूणच्या अपरांत भूमितील वाङ्मयीन चळवळीचे प्रणेते, इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे, संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक व लेखक धनंजय चितळे यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन पत्रभेट कार्यकारिणी मंडळ, नागपूर व पत्रभेट केंद्र, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दिवाळी अंकाच्या संपादक अपूर्वा मार्डीकर व पत्रभेट चिपळूण केंद्र प्रमुख अर्चना सुनील बक्षी व पत्रभेट कार्यकारिणी मंडळ नागपूर, पुणे यांनी केले आहे.