पुणे,
Suspected terrorist arrested in Pune पुणे शहर पुन्हा एकदा खळबळजनक घडामोडीमुळे चर्चेत आलं आहे. कोंढवा परिसरात मध्यरात्रीपासून तब्बल १८ ठिकाणी महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांकडून संयुक्त सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. या कारवाईदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांची चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या संयुक्त मोहिमेमुळे केवळ पुण्यातच नाही, तर संपूर्ण राज्यभरात आणि देशभरातही मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपासून या भागात संशयास्पद हालचाली सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानंतर केंद्र आणि राज्यातील तपास यंत्रणा सक्रिय झाल्या. त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

कोंढवा हा परिसर यापूर्वीही अशाच प्रकारच्या प्रकरणांमुळे चर्चेत राहिला आहे. दोन वर्षांपूर्वी याच भागातून बंदी घालण्यात आलेल्या एका दहशतवादी संघटनेचे तीन सदस्य अटक करण्यात आले होते. त्या कारवाईनंतर देशातील संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात तपास यंत्रणांना यश मिळालं होते. आता पुन्हा त्याच भागात संशयितांच्या हालचाली दिसत असल्याने पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, हे पूर्णपणे संयुक्त ऑपरेशन असून, राज्य पोलिस दल, पुणे पोलिस आणि केंद्रातील सुरक्षा एजन्सी एकत्रितपणे काम करत आहेत. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत माहिती प्रसिद्ध केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोंढवा परिसरात सुरू असलेल्या या गुप्त कारवाईमुळे स्थानिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी मात्र नागरिकांना शांतता राखण्याचं आणि कोणतीही अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.