नागपूर,
Mohan Yadav : छिंदवाडा जिल्ह्यातील दूषित सीरपमुळे बालकांच्या मृत्यूस दोषींना सोडणार नाही, असे ठणकावून सांगत तामिळनाडू सरकार योग्य ते सहकार्य करीत नसल्याचा आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आज नागपुरात केला.
मुख्यमंत्री मोहन यादव आज दुपारनंतर नागपुरात आले. आधी मिहानमधील अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) ते गेले. तेथे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी तेथे उपचार घेत असलेल्या छिंदवाडा जिल्ह्यातील बालकांची भेट घेतली. त्यांचे पालक व डॉक्टरांसोबत आजार, सद्यस्थिती व उपचार याबाबत जाणून घेतले. बालकांच्या पालकांना धीर दिला.
यानंतर एका खाजगी रुग्णालयात व नंतर मेडिकलमध्ये दाखल बालकांची भेट घेतली. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी तेथे उपचार घेत असलेल्या छिंदवाडा जिल्ह्यातील बालकांची भेट घेतली. त्यांचे पालक व डॉक्टरांसोबत आजार, सद्यस्थिती व उपचार याबाबत जाणून घेतले. बालकांच्या पालकांना धीर दिला.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी नंतर पत्रकारांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, तामिळनाडू राज्यात निर्मित दूषित कफ सीरपमुळे किडनी खराब होऊन मुलांचा मृत्यू झालाय. काही उपचार घेत असून त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी आज नागपुरात आलो होतो.
तामिळनाडूमधील संबंधित कंपनीच्या आरोपीला अटकसुद्धा केली आहे. तामिळनाडूच्या एका कंपनीने हे सीरप तयार केले आहे. तेथील औषध नियंत्रकांकडून या औषधाबाबत योग्य अहवाल अपेक्षित आहे. तथापि, तामिळनाडू सरकार अपेक्षेप्रमाणे सहकार्य करत नाही. औषध तयार करणारी कंपनी या औषधासाठी पूर्णपणे जबाबदार आहे, असा आरोप तसेच अगदी लहान जागेत एवढा मोठा कारखाना कसा सुरू आहे, असा सवाल मोहन यादव यांनी केला.
ड्रग लायसन्स कसे दिले? एकदा रद्द झाल्यावर त्याला पुन्हा लायसन्स कसे देण्यात आलं. एवढ्या मोठ्या कंपनीला कशा पद्धतीने परवानगी देण्यात आली वगैरे आरोप करणाèया राजकारण करणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी, राहुल गांधींनी तामिळनाडूमध्ये जावे. तामिळनाडू सरकारचा निषेध करावा, असे मोहन म्हणाले.
काही अहवाल यायचे आहेत. ते आल्यानंतर पुढील कारवाई होईल. हेच औषध काही लिहित होते, त्यांच्यावरसुद्धा कारवाई केली आहे. कोणत्याही दोषीला सोडणार नाही, कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली.