तंत्रवेध. . .
डॉ. दीपक शिकारपूर
zoho ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारताची संस्कृती असून, भारताच्या कामगिरीचा प्रभाव सध्या संपूर्ण जगावर पडत आहे. जगाच्या कल्याणासाठी भारताचे मोठे योगदान आहे. 12 मे 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची हाक दिली. स्वावलंबी भारत अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाद्वारे चालवलेल्या व्यवस्थांवर आधारित पद्धत, व्हायब्रंट डेमोग्राफी (युवा सामर्थ्य) आणि मागणी या पाच स्तंभांवर उभा असेल. त्याद्वारे आमच्या मागणी आणि पुरवठा साखळीची ताकद संपूर्ण क्षमतेसाठी वापरली जावी. सध्याच्या वैश्विकीकरणाच्या जमान्यात अर्थातच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अशी कप्पेबंदी करता येणार नाही. जागतिक पुरवठा साखळीत आपल्याला महत्त्वाची भूमिका निभावता येईल. पूर्वी आपण अनेक गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून होतो. उदाहरणार्थ, काही खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा अगदी काही औषधंसुद्धा बाहेरून मागवावी लागत होती. पण कोरोनासारखे संकट आले, तेव्हा लक्षात आले की, आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो, तर अडचणीच्या वेळी आपल्याला मदत मिळणार नाही. म्हणूनच ‘आत्मनिर्भर’ होणे खूप महत्त्वाचे आहे. हेच अनेक प्रकारे संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर)बद्दलही म्हणता येईल. आपण संगणक प्रणाली निर्यात आणि सेवा क्षेत्रात अग्रेसर असलो तरी हाताच्या बोटावर मोजण्याइतके संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर प्रोडक्ट) विकसन पूर्णपणे भारतात झाले आहे. आता हे चित्र नक्कीच बदलले आहे आणि याला कारण आहे ‘झोहो’. झोहोने अनेक यशस्वी बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर उद्योगांपुढे आव्हान उभे केले आहे. झोहो ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असून व्यवसायासाठी आवश्यक असणारी वेबवर चालणारी टूल्स आणि सॉफ्टवेअर विकसित करते.
बहुचर्चित ‘झोहो वन’ या पॅकेजद्वारे 45 हून अधिक अॅप्स मिळतात. या पॅकेजमुळे सीआरएम, मार्केटिंग, अकाऊंटिंग, एचआर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि इतर आवश्यक कार्ये एका ठिकाणी करणे शक्य होते. हे अॅप वेब, डेस्कटॉप आणि मोबाईलवर सहज वापरता येते. चेन्नई शहरातील एका छोट्या अपार्टमेंटमधून सुरुवात करून यशस्वी झालेली ‘झोहो’ ही एक कंपनी आहे. ही कंपनी वेब-आधारित बिझनेस टूल्स (व्यवसाय साधने) पुरवणारी एक अग्रणी कंपनी म्हणून उदयाला आली आहे. व्यवसायाचे संपूर्ण कामकाज क्लाऊडवरून चालवण्यासाठी लागणारी सर्व प्रमुख अॅप्लिकेशन्स ती एकाच क्लाऊड प्लॅटफॉर्मवर पुरवते. झोहोची स्थापना श्रीधर वेम्बू यांनी केली. या कंपनीची नोंदणी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे ‘अॅडव्हेंटनेट इंक’ या नावाने झाली. श्रीधर वेम्बू यांनी आयआयटी मद्रासमधून पदवी आणि अमेरिकेतून पीएच. डी. पूर्ण केल्यानंतर हा व्यवसाय सुरू केला होता. झोहोने 2005 मध्ये झोहो कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्लॅटफॉर्मद्वारे आपला प्रवास सुरू केला आणि आता व्यवसायाच्या आणि एंटरप्राईजच्या सर्व विभागांमध्ये विस्तार केला आहे. कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे, तसेच तिची कार्यालये सिंगापूर, जपान, चीन आणि भारतामध्ये आहेत. कंपनी ‘झोहो वन’ नावाचे एंटरप्राईजस्तरीय सब्स्क्रिप्शन (सदस्यता) देखील देते. यामध्ये झोहोची 40 अॅप्लिकेशन्स समाविष्ट आहेत. यामुळे सुलभ व्यवसायासाठी एक ‘ऑपरेटिंग सिस्टिम’ तयार होते. जगभरातील 180 हून अधिक देशांमध्ये या प्लॅटफॉर्मचे 5 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत.
‘इंजिनीअरिंगद्वारे मार्केटिंग’ हे झोहोचे अंतिम व्यवसाय मॉडेल आहे. यामुळे लोकांना सुरुवातीचे कोणतेही शुल्क न देता त्यांची अॅप्लिकेशन्स वापरण्याची संधी मिळते. तसेच ही कंपनी जाहिरातींद्वारे कमाई करत नाही. 2024 पर्यंत कंपनीमध्ये 17,000 हून अधिक कर्मचारी असून ‘फोर्ब्स’च्या मार्च 2025 च्या अहवालानुसार, झोहोने जाहीर केले की त्यांचे 2024 या वर्षातील उत्पन्न 1.5 अब्ज रुपये होते, जे अंदाजे 12,525 कोटी रुपये इतके आहे. या यशस्वी व्यवसाय मॉडेलमागे केवळ त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता आहे. त्यांच्या ‘फ्रीमियम मॉडेल’मुळे सुरुवातीला विनामूल्य साईन-अप करण्याची परवानगी मिळते आणि त्यानंतर गरज असल्यास प्रीमियम अपग्रेड कार्यक्रमासाठी विशिष्ट शुल्क आकारले जाते.zoho झोहो आपल्या नफ्याच्या सुमारे 50 टक्के रक्कम प्रथम नवीन प्रकल्पांमध्ये खर्च करण्यास किंवा पुन्हा गुंतवण्यास प्राधान्य देते. झोहोचा एकूण खर्च स्वाभाविकपणे कमी असतो, कारण कंपनीचा नेहमीच असा विचार असतो की उत्पादने स्वत: बोलली पाहिजेत (उत्पादनांनी स्वतःची जाहिरात केली पाहिजे) आणि त्यामुळे ती मार्केटिंगवर पाच टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करणे टाळते. झोहोची सगळी अॅप्स अतिशय युजरफ्रेंडली आहेत. ट्युटोरियल्स आणि व्हिडीओ मार्गदर्शने असल्याने शिकणे सुलभ आहे. झोहो पाचशेपेक्षा अधिक लोकप्रिय अॅप्स, प्रोग्रॅम्सशी सहज जोडता येते. उदा. मायक्रोसॉफ्ट 365, गुगल वर्कप्लेस वगैरे.
झोहो वापरताना आपल्या व्यवसायासाठी आवश्यक डेटा कस्टम डॅशबोर्डमध्ये पाहता येतो, रिपोर्ट्स मिळतात. विक्री आणि मार्केटिंगसाठी ऑटोमेटेड टास्क्स, फॉलोअप्स, लीड स्कोअरिंग शक्य होते. झोहोची किंमत इतर मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी आहे आणि फ्री/ट्रायल प्लान सुद्धा उपलब्ध आहे. अँड्रॉईड आणि अॅपल आयओएससाठी कंपनीची सगळी प्रमुख अॅप्स उपलब्ध आहेत. झोहोची भविष्यातील योजना हे तंत्रज्ञान आणि व्यूहात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि नवोन्मेषी आहेत. या योजनांमध्ये एआय एजंट, आयओटी सक्षम सोल्यूशन्स, सिक्युरिटी, नो-कोड/लो-कोड डेव्हलपमेंट, जगभरातील विस्तार आणि दीर्घकालिक पायाभूत संशोधनाचा समावेश होतो. पारंपरिक मोठ्या जनरेटिव्ह एआय मॉडेल्सच्या तुलनेत झोहो विशिष्ट, छोटे आणि उद्योगकेंद्रित एआय एजंट तयार करत आहे. हे एजंट विविध बिझनेस टास्कसाठी वापरण्यात येतात. जसे, ऑटोमेटेड रिपोर्टिंग, सिक्युरिटी आणि रियल-टाईम डिसिजन मेकिंग. कंपनीच्या झिया एआयच्या माध्यमातून विविध थर्ड-पार्टी अप्लिकेशन्सशी कनेक्टिव्हिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिळवता येते. जगभर विस्तार व लोकल इनोव्हेशनच्या पातळीवर बोलायचे तर नवीन डेटा सेंटर्स, स्थानिक कार्यालये, संशोधन केंद्रे आणि स्थानिक समुदाय व विद्यापीठांशी कंपनी आणि उत्पादनांचे सहकार्य आहे. संयुक्त प्रोजेक्ट्स आणि स्थानिक भागीदारीचा विचार करता स्टार्टअप्स, शिक्षणसंस्था आणि आर अॅण्ड डी केंद्रात कंपनीतर्फे भागीदारीचे आयोजन शक्य होते.
अॅडव्हान्स्ड सिक्युरिटी आणि कंप्लायन्स टूल्सच्या अनुषंगाने विचार करता लोगो 360 क्लाऊड आणि इंटीग्रेटेड सिक्युरिटी सोल्यूशन एकत्रित करत डेटा प्रोटेक्शन आणि कंप्लायन्स मजबूत करते. भारतीय उद्योग आणि लघुउद्योगांना झोहो वापरणे सोपे, किफायतशीर आणि सुरक्षित आहे. हे क्लाऊडवर आधारित असल्याने कुठूनही वापरता येते. मोबाईल अॅप्ससह सहज प्रवेश मिळतो. भारतीय बाजाराच्या गरजेनुसार बनवलेले असल्याने लघुउद्योगांसाठी स्वस्त आणि सोपे आहे. कंपनीच्या उत्पादनांवर सेव केला जाणारा सर्व डेटा भारतात सुरक्षित ठेवला जातो.zoho त्यामुळे व्यवसाय डिजिटल करण्यासाठी ‘झोहो’ एक लक्षवेधी पर्याय ठरतो. झोहोची भुरळ पडल्याने अनेक प्रथितयश कंपन्या त्याचे वापरकर्ते झाले आहेत. भारताचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मायक्रोसॉफ्ट आणि गूगलच्या उत्पादनांऐवजी त्यांच्या कामासाठी झोहोच्या स्वदेशी उत्पादकता प्लॅटफॉर्मचा स्वीकार केला आहे. त्यांनी इतरांनाही भारतीय तंत्रज्ञान उत्पादने वापरण्याचे आवाहन केले आहे. पीयूष गोयल आणि धर्मेंद्र प्रधानसारख्या इतर केंद्रीय मंत्र्यांनीही झोहोच्या ‘अरात्ताई’ मेसेजिंग अॅपचा आणि इतर प्लॅटफॉर्मचा वापर सार्वजनिकरित्या स्वीकारला आहे. राजकारणी नव्हेच तर अनेक उद्योगही झोहो वापरतात. भारतातील सर्वांत मोठ्या स्टॉक ब्रोकरेज प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या झेरोधानेही आपल्यासाठी आणि ग्राहक व्यवस्थापनासाठी झोहोच्या प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)