नवी दिल्ली,
Ashwin scolds Gautam Gambhir भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या निवडीवरून संघ व्यवस्थापनात आणि चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. त्यांनी हर्षित राणाला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान दिल्याने, अनुभवी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. या निर्णयावर आता माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांनी तीव्रप्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करत अर्शदीपच्या क्षमतेवर ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
अश्विन यांनी त्यांच्या ‘अश की बात’ या यूट्यूब कार्यक्रमात बोलताना सांगितले की, जर जसप्रीत बुमराह खेळत असेल, तर त्याच्या नंतरचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणजे अर्शदीप सिंग. आणि जर बुमराह अनुपस्थित असेल, तर पहिला पर्याय म्हणून अर्शदीपला संघात असायलाच हवे. त्यांनी पुढे सांगितले की, अर्शदीपला वारंवार बाहेर बसवले जात आहे आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास आणि लय दोन्हीवर परिणाम होत आहे. मला समजत नाही, इतक्या प्रभावी गोलंदाजाला का सतत संघाबाहेर ठेवले जाते.
२६ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भारतासाठी ६५ टी-२० सामन्यांत १०१ बळी घेतले आहेत. पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये त्याची अचूक गोलंदाजी ओळखली जाते. तरीही, त्याला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर तज्ज्ञांपासून चाहत्यांपर्यंत सगळीकडून टीका झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला चार विकेटने पराभव पत्करावा लागला. या सामन्यात अर्शदीपऐवजी हर्षित राणा संघात होता. हर्षितने फलंदाजीत ३५ धावांचे योगदान दिले, परंतु गोलंदाजीत तो प्रभाव पाडू शकला नाही. ट्रॅव्हिस हेड आणि मिशेल मार्श यांनी पॉवरप्लेमध्ये त्याच्यावर जोरदार फटकेबाजी केली.
अश्विन म्हणाले, हे हर्षितच्या खेळावर टीका नाही, पण हा विषय अर्शदीपचा आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकात अर्शदीप प्रभावी ठरला होता, पण त्यानंतर त्याला सातत्याने बाजूला ठेवण्यात आले. त्याला इतक्या वेळा बेंचवर बसवले की त्याची गती आणि आत्मविश्वास दोन्ही कमी झाले आहेत. माजी फिरकीपटूने पुढे सांगितले की, आशिया कपमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली होती. तो लयीत येत होता, पण त्याला सातत्याने खेळवले नाही, तर भारताचा चॅम्पियन गोलंदाज त्याची ती धार गमावेल. अर्शदीपसारख्या प्रतिभावान खेळाडूला संघात नियमित संधी दिली नाही, तर तो लवकरच दूर जाईल. त्यांच्या या विधानानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निवडीवर पुन्हा एकदा चर्चेचे वादळ उठले आहे. आता पाहावे लागेल की गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापन या टीकेनंतर पुढील सामन्यांत काही बदल करतात का.