तभा वृत्तसेवा
उमरखेड,
Attack on Police : शहरातील सारडा पेट्रोल पंपासमोर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीच्या उपोषण मंडप हटविताना पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस हवालदार गजानन माधव पोले यांच्या तक्रारीवरून रमेश चव्हाण (60), राहुल मोहितवार (34), गुलाब सूर्यवंशी (47), प्रवीण देशपांडे (42), गजानन देशमुख (47), गोपाळ झाडे (42), अभय पवार (54) सर्व रा. उमरखेड यांच्यावर कलम 132, 121 (2), 296, 189 (2), 190, 49, 281, 54 (भान्यासं) सह कलम 135 महाराष्ट्र पोलिस अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उमरखेड उपविभागीय दंडाधिकाèयांच्या आदेशांनुसार शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी ठाणेदारांनी उपोषणाचा मंडप हटविण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलिस पथक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी गेले असता मंडपातील काही उपोषणकर्त्यांनी मंडप हटविण्यास विरोध दर्शविला.
दरम्यान, काही व्यक्तींनी गाव पेटवू, पेट्रोलपंप जाळू अशा धमकीच्या घोषणा देत जमावाला चिथावणी दिली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
यावेळी एका अल्पवयीनाने गजानन पोले यांच्या नाकावर ठोसे मारून दुखापत केली. जखमी हवालदाराला तत्काळ सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश मुंडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.