वॉशिंग्टन,
Bankim Brahmabhatt in America अमेरिकेतील आर्थिक विश्वात एका भारतीय वंशाच्या उद्योगपतीने प्रचंड खळबळ माजवली आहे. बंकिम ब्रह्मभट्ट, हे नाव सध्या वॉल स्ट्रीटवर सर्वाधिक चर्चेत आहे. या भारतीय वंशाच्या उद्योगपतीवर तब्बल ५०० दशलक्ष डॉलर्सच्या (सुमारे ४,२०० कोटी रुपये) फसवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध गुंतवणूक संस्था ब्लॅकरॉक आणि तिची भागीदार एचपीएस इन्व्हेस्टमेंट पार्टनर्स या खाजगी कर्जगुंतवणूक शाखांना लक्ष्य केल्याचा आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आला आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने या धक्कादायक प्रकरणाचा तपशील उघड केला आहे. अहवालानुसार, ब्रह्मभट्ट यांच्या ब्रॉडबँड टेलिकॉम आणि ब्रिजव्हॉइस या कंपन्यांमार्फत मोठ्या आर्थिक फसवणुकीचा डाव रचण्यात आला. या कंपन्यांनी बनावट खात्यांची निर्मिती करून कर्जासाठी दाखवलेली मालमत्ता आणि उत्पन्नाचे तपशील पूर्णपणे खोटे असल्याचे उघड झाले आहे.
सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्यासारखे भासत होते. २०२० मध्ये ब्रह्मभट्ट यांच्या कंपन्यांना एचपीएसकडून मोठ्या प्रमाणात कर्ज दिले गेले. या कर्जाचा उद्देश होता टेलिकॉम व्यवसायाच्या विस्तारासाठी निधी पुरवणे. तथापि, तपासादरम्यान उघड झाले की, या निधीपैकी मोठा भाग भारत आणि मॉरिशस येथील ऑफशोअर खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला होता. एचपीएसने या व्यवहारांबाबत शंका व्यक्त केली आणि स्वतंत्र पडताळणी प्रक्रिया सुरू केली. त्यावेळी लक्षात आले की, कंपनीकडून दाखवण्यात आलेली उत्पन्नाची आकडेवारी आणि ग्राहकांची यादी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. कर्जदारांच्या म्हणण्यानुसार, ब्रह्मभट्ट यांनी बनावट बिले, करार, ईमेल्स आणि आर्थिक ताळेबंद तयार करून गुंतवणूकदारांना फसवले.
सुरुवातीला एचपीएसने सुमारे ३८५ दशलक्ष डॉलर्स इतकी गुंतवणूक केली होती, जी पुढे वाढत ४३० दशलक्ष डॉलर्सपर्यंत गेली. परंतु निधीचा वापर संशयास्पद दिसू लागल्यावर अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. त्यावेळी ब्रह्मभट्ट यांनी सर्व आरोप नाकारत काहीही चुकीचे नाही असे आश्वासन दिले. मात्र, काही काळानंतर त्यांनी संपर्क तोडला आणि चौकशीपासून स्वतःला दूर ठेवले. जुलै महिन्यात एचपीएसच्या एका अधिकाऱ्याने न्यूयॉर्कमधील गार्डन सिटी येथील कार्यालयात भेट दिली, तेव्हा ते कार्यालय बंद आढळले. या घटनेनंतर संपूर्ण गुंतवणूक समुदायात खळबळ माजली.
डब्ल्यूएसजेनुसार, एचपीएसने त्यांच्या काही ग्राहकांना सांगितले आहे की त्यांना वाटते की बंकिम ब्रह्मभट्ट सध्या भारतात असल्याची शक्यता आहे. अमेरिकन तपास यंत्रणा या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती आणखी मोठी असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, बंकिम ब्रह्मभट्ट यांनी आपल्या बाजूने सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, हे सर्व आरोप निराधार आहेत आणि सत्य बाहेर आल्यानंतर सर्व स्पष्ट होईल. या घोटाळ्यामुळे केवळ गुंतवणूकदारांमध्येच नव्हे, तर अमेरिकेतील व्यावसायिक जगतात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. ब्लॅकरॉकसारख्या जागतिक वित्तीय संस्थेला फसवणुकीचा बळी बनवणे हे अत्यंत गंभीर मानले जात असून, या प्रकरणाचा निकाल पुढील काही आठवड्यांत ठरेल, अशी अपेक्षा आहे.