अमरावती,
S. Srinivasan Reddy : पक्षांमुळे निसर्गाचे संतुलन कायम राहते. आज निसर्गासोबतच पक्ष्यांच्या संवर्धनाची तसेच त्यांच्या संरक्षणाची गरज आहे. त्यासाठी वनविभागासोबतच पक्षीमित्र संघटना, पक्षीप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी केले. येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शनिवारी वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था तसेच पक्षीमित्र संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय तिसरे अखिल भारतीय व ३८ वे महराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर महापालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा, माजी महापौर मिलिंद चिमोटे, वन्यजीव व पर्यावरण संस्थेच्या अध्यक्ष डॉ. अंजली देशमुख, सचिव डॉ. जयंत वडतकर, डॉ. गजानन वाघ, डॉ. मंजूषा वाठ आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना रेड्डी म्हणाले की, पक्षांच्या संवर्धनासाठी सामाजिक संस्था करीत असलेल्या कार्याला वनविभागाचे नेहमीच सहकार्य लाभेल. याप्रसंगी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा म्हणाल्या, अमरावती शहर तसेच शहरालगतचा परिसर हा निसर्गाने समृद्ध असून त्याठिकाणी पक्षांच्या अधिवासाच्या दृष्टीने वातावरण तयार आहे. तो अधिवास सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नागरिकांनी पार पाडली पाहिजे. पक्षी संवर्धनाची ज्योत अशाच प्रकारे तेवत ठेवण्याचे आवाहन माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी केले.
अधिवेशनानिमित्त तयार करण्यात आलेल्या ’रानवेध’ या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या अधिवेशनाला राज्यभरातील जवळपास ३०० पक्षिमित्र, तज्ञ, अभ्यासक सहभागी झाले आहेत. रविवारी दिवसभर विविध सत्र होणार आहे. यावेळी पक्षी क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
पक्ष्यांची गरज पटवून सांगा : परदेशी
रानावनात राहून आपली उपजीविका करणार्या अनेक जमाती असून त्यांना आपल्या चळवळीशी जोडणे आवश्यक आहे. उपजीविका करीत असताना निसर्गाशी एकरूप होण्यासाठी पक्षांची किती गरज आहे, हे त्यांना पटवून सांगण्याची गरज आहे. त्यासाठी पक्षीमित्र संघटनेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन संमेलनाध्यक्ष तथा वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी व्हीसीद्वारे केलेल्या आपल्या मनोगतातून व्यक्त केले.