शेकदरी धरणात बुडून युवकाचा मृत्यू

लक्ष्मी विसर्जनासाठी गेले होते मंडळ

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
वरूड,
Shekadari Dam : तालुक्यातील टेंभुरखेडा येथील तरुणाचा लक्ष्मी विसर्जनाचेवेळी शेकदरी धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. परंतु, मृतदेहाचा शोध लागला नाही. अखेर शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अमरावतीवरून एनडीआरएफ पथक दाखल झाले व मृतदेह बाहेर काढला.
 
 
JM
 
शुभम श्रावण सोनवणे असे या २५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास लक्ष्मी विसर्जनासाठी गावातील मंडळासोबत शेकदरी धरणावर तो गेला होता. मंडळातील इतर तरुणांसह तो धरणाच्या पाण्यात स्नानासाठी उतरला असता, पाण्यात उडी घेतल्यानंतर तो वर आला नाही. काही वेळाने शोध घेतला असता तो सापडला नाही, त्यामुळे धरण परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जरूड चौकीचा पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. अंधार व परिस्थिती लक्षात घेता शोध मोहीम थांबविण्यात आली व अमरावती येथून एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले. हे शोध पथक शनिवारी सकाळी घटनास्थळी आले आणि धरणातील मृतक शुभमचा मृतदेह शोधण्यात अखेर या पथकाला यश आले.
 
 
उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठवून अंत्यसंस्काकरिता नातेवाईकांना सोपविण्यात आला. याप्रकरणी वरूड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. शुभमचे आईवडील मोलमजुरी करत असून ते चार भावंडे असल्याचे कळते. मात्र या आनंदाच्या प्रसंगी घडलेल्या अपघाताने संपूर्ण मंडळ तसेच टेंभुरखेडा गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे. शोध मोहीम सुरू असतेवेळी वरूडचे तहसीलदार रामदास शेळके, नायब तहसीलदार पंकज चव्हाण, ठाणेदार अर्जुन ठोसरे, मंडळधिकारी प्रमोद सोळंकी, वैशाली मिसाळ, तलाठी सचिन पवार, बीट जमादार मिनल खांडेकर यांच्यासह तहसील व पोलिस कर्मचारी घटनास्थळी लक्ष ठेवून होते.