देवळी,
rajesh-bakane : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने संघटनशक्तीचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक आढावा मोहीम सुरू केली आहे. पुलगाव, देवळी नगरपरिषद, तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रांतील प्रभागनिहाय आणि पंचायत समिती गणनिहाय बैठका आ. राजेश बकाने यांच्या नेतृत्वात घेण्यात आल्या.
या बैठकींमध्ये बुथप्रमुख, शती केंद्रप्रमुख तसेच पक्षाच्या विविध आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक प्रभाग व गणनिहाय संघटनाच्या तयारीचा आढावा घेत आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचा विजय निश्चित करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक दिशा आ. बकाने यांनी दिली.
भाजप हा केवळ राजकीय पक्ष नाही तर प्रत्येक घराशी जोडलेले कुटुंब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा जो प्रवाह निर्माण झाला आहे, तो जनतेपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. देवळी-पुलगाव मतदारसंघात झालेली विकासकामे, शासकीय योजनांचा लाभ आणि जनतेचा विश्वास या तीन आधारांवर आपला विजय ठरेल. प्रत्येक बुथ कार्यकर्ता हेच भाजपचे बळ आहे. कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने जनसंपर्क मोहीम राबवावी, घराघरांत पोहोचून सरकारच्या योजनांची माहिती द्यावी आणि जनतेशी संवाद करावा. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजय हे भविष्यातील राजकीय समीकरण ठरवणारे असेल, आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने ही निवडणूक आपली जबाबदारी समजून लढवावी, असे आ. बकाने म्हणाले. बैठकीदरम्यान प्रभागनिहाय संघटन रचना, मतदार यादीचे पुनरावलोकन, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची दिशा, तसेच तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीबाबत सविस्तर चर्चा झाली. देवळी आणि पुलगाव नगरपरिषद क्षेत्रातील प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांनी आतापासूनच जनसंपर्क मोहीम सुरू केली असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणनिहाय बैठकींमध्ये ग्रामीण भागातील प्रश्न, विकासाच्या संधी, आणि केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन आखण्यात आले. या बैठकींना भाजपा जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, महिला मोर्चा, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, व्यापारी आघाडी, अनुसूचित जाती-जमाती आघाडी, तसेच वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.