पुणे,
Get me pregnant and take 25 lakhs सायबर फसवणुकीच्या नव्या आणि विचित्र प्रकाराने महाराष्ट्रातील पुणे शहर हादरले आहे. एका ऑनलाइन जाहिरातीवर विश्वास ठेवणं एका कंत्राटदाराला इतकं महाग पडलं की त्याने तब्बल ११ लाख रुपये गमावले. “मला गर्भवती बनवू शकणाऱ्या व्यक्तीची गरज आहे असा मजकूर असलेली जाहिरात पाहून त्याने त्यावर क्लिक केले आणि याच क्षणापासून त्याचा आर्थिक घसरणीचा प्रवास सुरू झाला.
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित कंत्राटदाराने जाहिरातीवरील दुव्यावर क्लिक केल्यानंतर काही मिनिटांतच त्याच्याशी काही अनोळखी व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांनी स्वतःला एका खास ऑनलाइन सेवा संस्थेशी जोडलेले असल्याचे सांगत आकर्षक ऑफर देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला केवळ “नोंदणी शुल्क” म्हणून काही हजार रुपये मागण्यात आले. पीडिताने पैसे भरताच त्या टोळीने त्याच्याशी सातत्याने संपर्क ठेवला आणि नवीन सबबी सांगत हळूहळू अधिक पैसे मागू लागले.
“प्रोसेस फी”, “सदस्यत्व शुल्क”, “गोपनीय करार रक्कम”, अशा वेगवेगळ्या नावाखाली पैसे वसूल केले गेले. पीडिताला विश्वास बसावा म्हणून त्याला बनावट पावत्या आणि ओळखपत्रांसारखी कागदपत्रेही पाठवण्यात आली. काही दिवसांतच फसवणूक करणाऱ्यांनी त्याच्याकडून हप्त्याहप्त्याने तब्बल ११ लाख रुपये उकळले. जेव्हा सतत नवीन शुल्क आणि प्रक्रिया शुल्काची मागणी सुरूच राहिली, तेव्हा कंत्राटदाराला संशय आला. त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि चौकशीत हे सायबर टोळीचे जाळे असल्याचे उघड झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून फसवणूक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे.