गोंदिया जिल्ह्याच्या बाल व मातामृत्यू दरात घट

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
गोंदिया,
Gondia News : राज्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून या प्रयत्नांना यश आल्याचे सरकारच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यातच गोंदिया जिल्ह्यातही अपुरे कर्मचारी असताना अर्भक, बाल व माता मृत्यू दर कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. गेल्या वर्षी ४ मातामृत्यूंची नोंद जिल्ह्यात करण्यात झाली होती, यावर्षी ६ महिन्यात २ माता मृत्यूची नोंद आहे.
 
 

JHJ 
 
 
 
२०२४-२५ या वर्षात महाराष्ट्राचा अर्भक मृत्यू दर १५ टक्के होता, तर गोंदिया जिल्ह्याचा १०.६७ टक्के, माता मृत्यू दर हा राज्याचा ३८ टक्के असून जिल्ह्याचा २८.२६ टक्के आहे. तसेच ० ते ५ वयोगटातील बालकांचे मृत्यू दर राज्याचा १६ टक्के तर जिल्ह्याचा १२ टक्केवर आला आहे. सर्व मृत्यू दर रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला गेला आहे. बीसीजीचे १०८ टक्के तर बर्थडोज ९३ टक्के प्रमाण लसीकरणाचे असल्याची माहिती माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत यांनी दिली. ते म्हणाले, राज्यात एक लाखामागे ६८ गरोदर मातांचा मृत्यू होत आहे. गोंदिया जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये ४ व २०२५-२६ मध्ये आजपर्यंत २ मातांचा मृत्यू झाला आहे. २०२४-२५ मध्ये १७६ व २०२५-२६ मध्ये आजपर्यंत ८५ अर्भक मृत्यू तसेच २०२४-२५ मध्ये २१६ व २०२५-२६ मध्ये आजपर्यंत १०२ बालमृत्यू नोंदवण्यात आले. राज्याच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यामध्ये माता व बालमृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचा दावा जिल्हा परिषदेच्यावतीने केला.
 
माता व बालमृत्यू प्रमाण रोखण्यासाठीचे उपाय गरोदर मातेच्या सोनोग्राफी व आवश्यक तपासण्या सरकारी आरोग्य संस्थेमार्फत करणे, गरदोर मातांशी नियमित संपर्क साधणे व तपासणी करणे, रुग्णवाहिका उपलब्ध ठेवणे, दुर्गम भागातील अतिजोखमीच्या गरोदर मातांना स्थलांतरित करणे, न्यू बॉर्न केअर कॉर्नरची स्थापनी करणे आदी उपाय सुचवण्यात आल्या.
 
घरी प्रसुती प्रमाण १ टक्क्यापेक्षाही कमी
 
 
गोंदियासारख्या नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील महिला प्रसूतीसाठी रुग्णालयांमध्ये दाखल होतात. महिलांची आरोग्य संस्थेतच सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने आग्रह धरला होता. विशेष म्हणजे त्यासाठी जनजागृतीही करण्यात आली. त्यामुळे महिलांची घरी प्रसूती होण्याचे प्रमाण एक टक्काही नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
 
 
राज्यातील जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय व काही उपजिल्हा रुग्णालयांत एसएनसीयूची स्थापना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बाळ जन्मल्यानंतर बाळाचे वजन कमी असल्यास, काविळ झाली असल्यास किंवा त्याला इतर कोणताही त्रास असल्यास बाळाला एसएनसीयू कक्षामध्ये दाखल करुन उपचार केले जातात. हा कक्ष रेडियंट वॉर्मर, फोटोथेरपी युनिट, इन्प्युजन पंप, मॉनिटर्स, नॉन इनवेसिव्ह व्हेंटीलेशन (सीपीएपी) यासारख्या उपकरणांनी सुसज्ज आहे. स्तनपानाविषयी मातेला, वडिलांना तसेच कुटूंबियांना योग्य माहिती पुरविण्यासाठी तसेच स्तनपान व शिशुपोषणास सक्षम असे वातावरण तयार करण्यासाठीचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात आला असून यात सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान व सहा महिन्यानंतर पूरक आहार देण्याबाबत आरोग्य केंद्रातील सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फेत समुपदेशन सातत्याने करण्यात येत असल्याने माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले.
-डॉ.अभिजित गोल्हार
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिप गोंदिया