नवी दिल्ली,
LPG cylinder price drop आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे भारतातील सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनी (IOCL, HPCL, BPCL) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत किंचित घट केली आहे. १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू झालेल्या या निर्णयानुसार १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत फक्त ५ ते ६.५ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीतील व्यावसायिक सिलिंडरची नवीन किंमत आता १,५९०.२५ रुपये झाली आहे. यापूर्वी ती १,५९५.५० रुपये होती.
दिल्लीतील घरगुती १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत मात्र कायम आहे. सामान्य ग्राहकांसाठी ती ८५३ रुपयांवर स्थिर आहे. भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमदेखील या किमतींचे अनुसरण करत आहेत.इतर महानगरांमध्ये देखील किंमतीत घट दिसून आली आहे. कोलकातामध्ये १९ किलो सिलिंडरची किंमत १,६९४ रुपयांपर्यंत घसरली आहे, मुंबईत ती १,५४२ रुपये आणि चेन्नईत १,७५० रुपये झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय बदल दिसून आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, १ ऑक्टोबर रोजी, किमतीत १५.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती, तर त्याआधी सलग सहा महिन्यांपासून दर महिन्याला किमतीत घट झाली होती. मार्च महिन्यात दिल्लीतील सिलिंडरची किंमत १,८०३ रुपये होती, जी एप्रिलमध्ये १,७६२ रुपये, मे महिन्यात १,७४७.५० रुपये, जूनमध्ये १,७२३.५० रुपये, जुलैमध्ये १,६६५ रुपये, ऑगस्टमध्ये १,६५१.३० रुपये आणि सप्टेंबरमध्ये १,६८० रुपयांवर पोहोचली होती. या सहा महिन्यांत सिलिंडरच्या किमतीत तब्बल २२३ रुपयांची घट झाली आहे.
दरम्यान, विमान इंधनाच्या (एटीएफ) किमतीत मात्र वाढ करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून दिल्लीतील एटीएफची किंमत प्रति किलोलीटर ८१७.०१ डॉलर झाली असून, १०० लिटर एटीएफची किंमत ९४,५४३.२० रुपये झाली आहे. कोलकातामध्ये ती ९७,५४९.६८ रुपये, मुंबईत ८८,४४७.८४ रुपये आणि चेन्नईत ९८,०८९.६९ रुपये झाली आहे.विशेष म्हणजे, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या नवीन घट निर्णयाचा फायदा फक्त व्यावसायिक एलपीजी वापरणाऱ्या ग्राहकांना होईल. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेत असतात, त्यामुळे भविष्यातील किंमतीत आणखी बदल होण्याची शक्यता राहिली आहे.