चंदिगढ,
Maharashtra Kesari Sikander Sheikh पंजाब पोलिसांच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (सीआयए) पापला गुज्जर या कुख्यात गुंड टोळीशी संबंधित चार संशयितांना अटक केली असून, त्यात महाराष्ट्र केसरी विजेता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू सिकंदर शेख याचाही समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून जवळपास १.९९ लाख रुपये रोख रक्कम, एक .४५ बोर पिस्तूल, चार .३२ बोर पिस्तुले, अनेक जिवंत काडतुसे आणि दोन स्कॉर्पिओ-एन एसयूव्ही वाहने जप्त केली आहेत.
संग्रहित फोटो
खरार पोलिस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यान्वये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात ही टोळी उत्तर प्रदेशातून अवैध शस्त्रे आणून पंजाबमध्ये पुरवठा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोहाली जिल्ह्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अटकेत असलेल्या संशयितांमध्ये सिकंदर शेख हा मूळचा महाराष्ट्रातील असून सध्या मुल्लानपूर गरीबदास येथे वास्तव्यास होता. इतर आरोपींमध्ये मथुरा जिल्ह्यातील दानवीर (२६), बंटी (२६) आणि नाडा नयागाव येथील कृष्णा उर्फ हॅपी गुज्जर (२२) यांचा समावेश आहे. सिकंदर हा बीए पदवीधर असून, क्रीडा कोट्यातून सैन्यात भरती झाला होता, मात्र नंतर त्याने नोकरीचा राजीनामा दिला. तो विवाहित असून, गेल्या पाच महिन्यांपासून भाड्याच्या घरात राहत होता.
दानवीर हा दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला असून, पैशासाठी गुन्हेगारीकडे वळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बंटी बारावी उत्तीर्ण आणि विवाहित आहे. तर हॅपी गुज्जरवर यापूर्वीच मारामारीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांच्या तपासात विक्रम उर्फ पापला गुज्जर चालवत असलेली ही टोळी हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात सक्रीय असल्याचे उघड झाले आहे. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून शस्त्रे मिळवून ती पंजाबमध्ये विक्रीस ठेवली जातात. दानवीर आणि बंटी यांनी एसयूव्ही वाहनातून दोन पिस्तुले आणली होती, जी सिकंदरकडे देण्यात येणार होती आणि सिकंदर ती पुढे हॅपीकडे सुपूर्द करणार होता, असे चौकशीत उघड झाले.