'परिस्थिती बदललीय, शस्त्रं सोडा आणि मुख्य प्रवाहात या' - भूपती Video

आत्मसमर्पण केलेल्या भूपती भावनिक संदेश

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
गडचिरोली,
Bhupati माओवादी चळवळीच्या इतिहासात मोठा टप्पा मानला जाणारा घटक १५ ऑक्टोबर रोजी घडला. माओवादी केंद्रीय समितीचा प्रभावशाली सदस्य आणि जहाल नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ अभय याने तब्बल ६० सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केलं. महाराष्ट्राच्या माओवादी चळवळीतील ही सर्वात मोठी शरणागती ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या आत्मसमर्पणाने चळवळीच्या मुळावरच गदा आली. परंतु, यानंतर माओवादी केंद्रीय समितीने भूपतीला ‘गद्दार’ आणि ‘फितूर’ ठरवत त्याच्यावर जहाल टीकेची झोड उठवली. त्याच्यावर टोकाचे आरोप करण्यात आले, तसेच त्याची भूमिका ‘क्रांतीविरोधी’ असल्याचे ठरवून चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 
 
 

Bhupati 
 
व्हिडिओफीत प्रसिद्ध केला
 
या सर्व घडामोडीनंतर, Bhupati १ नोव्हेंबर रोजी भूपतीने जिल्हा पोलिसांच्या सहाय्याने पाच मिनिटे सतराशे सेकंदाची एक व्हिडिओफीत प्रसिद्ध केली. या फितीत त्याने सर्व आरोपांचे खंडन करत आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले. शांत, संयमी आणि ठाम आवाजात बोलणाऱ्या भूपतीने माओवादी कार्यकर्त्यांना थेट आवाहन केले — “आता परिस्थिती बदलली आहे. शस्त्रे सोडा आणि मुख्य प्रवाहात या.” त्याने सांगितले की, १६ सप्टेंबर रोजीच आपण शस्त्रबंदीचा विचार प्रथम व्यक्त केला होता, कारण बदलत्या परिस्थितीची जाणीव त्याला झाली होती. त्यानंतर महिन्याभरातच ६० सहकाऱ्यांसह त्याने आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला. “आमचा हा निर्णय परिस्थितीचे संकेत ओळखून घेतलेला आहे. समाजात जनतेच्या प्रश्नांवर काम करायचे असल्यास शस्त्र नव्हे, तर संवाद आणि कायद्याची चौकट गरजेची आहे,” असे तो या चित्रफितीत म्हणतो.
 
 
 
 
 
 शांततेच्या मार्गाला हात द्या
 
 
माओवादी केंद्रीय Bhupati समितीने मात्र या आत्मसमर्पणांना “देशद्रोही कृत्य” ठरवत आपल्या माजी सहकाऱ्यांवर विषारी हल्ला केला. ‘गद्दार’, ‘फितूर’, ‘विकाऊ’ अशा शब्दांत भूपती, रुपेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हिणवण्यात आलं. या आरोपांवर प्रत्युत्तर देताना भूपतीने आपल्या व्हिडिओफितीत स्पष्टपणे म्हटलं की, “हे शब्द माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना शोभत नाहीत. आम्ही जनतेसाठीच काम करत आलो आहोत, आजही तेच करतोय. फरक इतकाच की आता आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून ते करणार आहोत.”त्याने पुढे आवाहन केले की, “चळवळीत अजूनही कार्यरत असलेल्या माओवादी सहकाऱ्यांनी शांतपणे, विचारपूर्वक परिस्थितीचा विचार करावा. आता शस्त्राने नव्हे, तर समाजकारणाने बदल घडविण्याची वेळ आली आहे.” या संदेशासोबत भूपतीने आपला आणि रुपेशचा मोबाईल क्रमांकही जाहीर केला, जेणेकरून इच्छुक माओवादी किंवा नागरिक थेट संपर्क साधू शकतील. त्याने सुज्ञ नागरिक आणि आदिवासी समाजालाही आवाहन केले की, “आमच्या भूमिकेचे समर्थन करा. शांततेच्या मार्गाला हात द्या.” असे त्यांनी आवाहन केले आहे.