नागपूर,
Nitin Gadkari : स्किल सेंटर केवळ नागपुरातीलच नव्हे तर विदर्भातील लाखो युवकांच्या रोजगाराचे स्वप्न साकार करीत विदर्भाच्या सर्वांगिण विकासाला चालणा मिळणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री व एआयडीचे मार्गदर्शक नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

असोसिएशन फॉर डेव्हलपमेंट (एआयडी) चे विदर्भ ग्लोबल फाउंडेशन, नागपूर महानगरपालिका आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर स्किल सेंटर या कौशल्य विकास उपक्रमाचे लोकार्पण शनिवारी रॅडिसन ब्लू हॉटेलमधे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार अभिजीत वंजारी, आमदार मोहन मते, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्त वसुमना पंत, टाटा स्ट्राईव्हचे सीईओ अमेय वंजारी, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, प्रा. अनिल सोले, एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे, सचिव डॉ. विजयकुमार शर्मा, प्रशांत उगेमुगे, राजेश रोकडे, रवी संजय गुप्ता आणि राजेश बागडी, दीपेन अग्रवाल, जुल्फेश शाह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नागपूर स्किल सेंटरविषयी माहितीपटाच्या प्रक्षेपणाने यावेळी मनपा, एआयडी आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. अमेय वंजारी व आशिष काळे यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
आपल्या मार्गदर्शनात नितीन गडकरी पुढे म्हणाले,कौशल्य प्रशिक्षणाचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होणार असून विदर्भातील उद्योग आणि कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्याची गरज आहे. स्थानिक रोजगार उत्पन्न सुध्दा वाढेल. एकंदरीत विदर्भाच्या विकासासाठी जीडीपीत विदर्भाचा वाटा वाढवण्याकडे अधिक लक्ष्य केंद्रीत करावे लागणार आहे.
नागपूरातील मिहान मध्ये युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एआयडी व टाटा स्ट्राईव्ह यांच्यात झालेला करार अतिशय महत्वाचा ठरणार आहे. नागपूर शहराला केवळ स्मार्ट करून चालणार नाही तर ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी करुन देणे आवश्यक आहे. स्मार्ट शहरांसोबत स्मार्ट गावेही तयार करण्यासाठी आता पुढील पाच वर्षात विदर्भातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ हजार युवकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून स्कील सेंटरची भविष्यात संख्या वाढवावी लागणार आहे. मिहानमध्ये आतापर्यंत एक लाख युवकांना रोजगार मिळाला आहे. यानंतर सुध्दा विविध क्षेत्रात संधी मिळणार आहे.
जानवेारीपासून कौशल्य अभ्यासक्रम - डॉ. अभिजीत चौधरी
एआयडी, टीसीआयटी आणि मनपा या तीन संस्थांच्या सहकार्याने नागपूर स्किल सेंटरची स्थापना होत आहे. येथे ३० हजार चौरस फूट क्षेत्रावर हे केंद्र उभे राहिले आहे. पुढील महिन्याभरात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन जानेवारीपासून कौशल्य अभ्यासक्रम सुरू होतील, अशी ग्वाही मनपा आयुक्त डॉ. अभिजीत यांनी दिली.
उद्योगांशी संलग्न अभ्यासक्रम -— अमेय वंजारी
टाटा स्ट्राईव्हतर्फे मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिक, सोलर, आयटी, बँकिंग आदी उद्योगाशी संलग्न असे दोन ते तीन महिन्यांचे अभ्यासक्रम आखले आहेत. यामुळे अनेक युवकांना नोकरी मिळाली आहे. गत अकरा वर्षांत २५ लाख विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ झाला आहे. नागपूर स्किल सेंटरच्या प्रशिक्षणानंतर उद्योगांमध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट दिले जाणार असल्याने या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन टाटा स्ट्राईव्हचे सीईओ अमेय वंजारी यांनी केले.
भविष्यासाठी तयार कुशल मनुष्यबळ
एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विदर्भाच्या विकासाकरिता एआयडीतर्फे विदर्भ ग्लोबल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे विदर्भ ग्लोबल स्किल अँड लॉजिस्टिक्स युनिव्हर्सिटीची स्थापना संचालन करण्याचा उद्देश आहे. भविष्यासाठी तयार कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या आणि प्रदेशात औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने उचललेले एआयडीचे नागपूर स्किल सेंटर एक पाऊल आहे.