rahul gandhi दैनंदिन जीवनशैलीत ज्या काही बाबी आपल्याला जिव्हाळ्याच्या वाटतात, त्यामध्ये राजकारण हा एक आवडता विषय असतो. अनेक जण राजकारणाकडे गांभीर्याने पाहात असल्याने, देशाच्या राजकारणात जे काही घडत, बिघडत असते, त्यानुसार त्यांच्या आनंदाचा निर्देशांक बदलत असतो. अनेकदा असे काही घडते की त्यामुळे त्यांना काहीतरी आशादायक वाटू लागते आणि असेही काही वेळा घडते, त्यामुळे नैराश्य वाटू लागते. कधी कधी राजकारणाविषयी चिंता वाटू लागते आणि कधी कधी किळसही येते. अलिकडच्या काळात तर चिंता वाटण्यासारख्याच घटना अधिक असाव्यात अशी स्थिती असल्याने, राजकारणाकडे गांभीर्याने पाहावयाचे की जे काही चालले आहे त्याकडे करमणुकीच्या भावनेने पाहावयाचे याचा संभ्रम वाटण्यासारखी स्थिती आहे. गेल्या काही महिन्यांत तर, राजकारण ही केवळ करमणूकच नव्हे, तर तो निव्वळ विनोद असावा असेही काही घडताना दिसू लागले आहे. दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांची आतषबाजी करण्यातली मजा अनुभवणे हा मुलांच्या आनंदाचा सोहळा असतो. यंदाच्या दिवाळीत मात्र, पावसाळी वातावरणामुळे काही फटाके वाजलेच नाहीत.
आपला फटाका हमखास वाजणार या विश्वासाने काही जण तो घेऊन मैदानात उतरले, त्याची वातही पेटविली आणि आता मोठ्ठा धमाका होणार या अपेक्षेने लोकांच्या नजराही त्या फटाक्याकडे लागल्या. फटाका वाजविणाèयानेही आपले कान झाकून घेतले आणि होणाऱ्या हादऱ्याने बरीच काही पडझड वगैरे होणार या अपेक्षेने वाटही पाहिली. पण त्यांना आणि लोकांनाही अपेक्षित धमाका झालाच नाही आणि फटाक्याची पेटविलेली वात आतल्या दारूपर्यंत पोहोचण्याआधीच विझून गेल्याने त्यांचाच हिरमोड झाला. आता दिवाळी संपल्यानंतर असे, न वाजलेले फटाके गोळा करून त्यांना दुसऱ्या फटाक्यांच्या वाती लावून पुन्हा वाजविण्याचा प्रयत्नही काही जणांनी सुरू केला आहे. कुणा एखाद्याने अगोदर वाजवलेला फटाका फुसका निघाल्यानंतर त्याला दुसऱ्या फुसक्या फटाक्याची वात लावून तो पुन्हा वाजविण्याचे तंत्र जमले की होणारा आनंद मूळ वातीच्या फटाक्यातून निघणाऱ्या आवाजाहूनही अधिक असतो. तो आनंद मिळविण्याचा प्रयत्न त्यामध्ये होता, हे उघड आहे. पण तो प्रयत्नदेखील फसल्यावर होणारा हिरमोड मात्र निराशाजनक असतो.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना, काही आठवड्यांपूर्वी काहीसा तोच अनुभव आला असावा. अॅटम बॉम्बचा धमाका उडविण्याच्या आवेशात मोठा गाजावाजा करून त्यांनी उभ्या पक्षाला कामाला लावून एक अॅटम बॉम्ब तयार केला आणि मोठ्या उत्साहात माध्यमांच्या साक्षीने त्यांनी या अॅटम बॉम्बची वातदेखील पेटविली. या फटाक्याचा मोठ्ठा धमाका होणार या अपेक्षेने त्यांनी स्वत:चेच कान घट्ट झाकूनही घेतले, पण तो फटाकाही वाजलाच नाही. मोठ्या अपक्षेने फटाक्याची वात पेटवावी, हाताने कान घट्ट झाकून घ्यावे आणि वात विझून गेल्याने आवाजही येऊच नये, असे झाल्यावर लहान मुलांना जे वाटते, तसेच काहीसे त्यांनाही झाले असावे. राहुल गांधी यांच्या त्या अॅटम बॉम्बचा स्फोट तर झाला नाहीच, पण तो साधा वाजलादेखील नाही. उलट, राहुल गांधी ज्या आवेशात आरोपांच्या माळा लावतात, तो आवेशच नंतर फुसका ठरतो हे पुन्हा एकदा दिसू लागल्याने त्यांचा हा नवा बॉम्बदेखील अगोदरच्या अनेक फुसक्या फटाक्यांप्रमाणेच निकामी ठरल्याचीच चर्चा सुरू झाली. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला मतचोरीचा फटका बसला होता, असा एक कांगावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनीही एकदा केला होता, तेव्हाही काँग्रेसजनांना तो मोठा अॅटम बॉम्ब वाटला होता. पण निवडणूक आयोगाने काँग्रेसला चर्चेसाठी पाचारण केल्यावर मात्र, या बैठकीत हजर राहण्याचे टाळून आपला बॉम्ब फुसका निघाल्याची अप्रत्यक्ष कबुलीच काँग्रेसने दिली होती. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मतचोरीचे काही दाखले दिल्यानंतर हेच आरोप प्रतिज्ञापत्राद्वारे दाखल करण्याचे आयोगाने दिलेले आव्हानही काँग्रेसने स्वीकारलेच नाही आणि नेहमीप्रमाणे हा नवा फटाकादेखील फुसका होता हे स्पष्ट झाले.
अॅटम बॉम्बचा धमाका उडविण्याच्या आवेशात राहुल गांधींना मैदानात उतरवायचे आणि ऐनवेळी तो बॉम्बच फुसका निघावा हा राहुल गांधींच्या बाबतीत काँग्रेसला येणारा हा काही पहिलाच अनुभव नाही. याआधीही राहुल गांधींचे अनेक फटाके असेच फुसके ठरले होते. त्यामुळे असे फुसके फटाके वाजविण्याऐवजी नव्या करमणुकीच्या खेळांचा सराव सुरू झालेला दिसतो. राहुल गांधी हेच या नव्या खेळांचे कप्तान आहेत. सध्या त्यांनी पंतप्रधान मोदी यांना घेरण्यासाठी लावलेल्या नव्या फटाक्याची वात काँग्रेसच्याच दिशेने फिरल्याचे दिसू लागले आहे. मोदी मतांसाठी काहीही करून दाखवतील, त्यांना नाच करावयास लावले तर ते नाचदेखील करतील असे काहीसे विचित्र विधान त्यांनी एका सभेत जाहीरपणे केल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर फिरू लागली आणि मतदारांच्या हातात हात गुंफून नाच करणाऱ्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि खुद्द राहुल गांधी यांच्याच चित्रफितींचा सुळसुळाट समाजमाध्यमांवर दिसू लागला. मतांसाठी नाच करण्याची गांधी कुटुंबाचीच परंपरा अधोरेखित करून राहुल गांधींचा नवा फटाकादेखील फुसका ठरविण्याकरिता समाजमाध्यमांवरील एक सजग वर्ग सज्ज झालेला दिसत आहे.
तरीही, अशा प्रकारे राहुल गांधी यांनी पेटविलेले फटाके फुसके निघाल्यानंतर न वाजलेल्या त्याच फटाक्यांना नव्या वाती लावून नवे स्फोट घडविण्याची नवीच कल्पना उद्धव ठाकरे यांच्या गटास सुचली आणि हुबेहूब राहुल गांधी यांनी केलेल्या तयारीचीच नक्कल करून आदित्य ठाकरे यांनी मतदारयाद्यांच्या घोळाचे प्रात्यक्षिक करून राहुल गांधींना जे जमले नाही ते करून दाखविण्याचा प्रयत्न केला. मागच्या आठवडाभरात अशाच ‘कॉपी पेस्ट’ उपक्रमांना महाराष्ट्राच्या राजकारणात उधाण आले होते. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांमधील घोळाचे काही नमुने कार्यकर्त्यांसमोर सादर केले आणि पुन्हा एकदा निवडणूक आयोगाविषयी संभ्रम पसरविण्याच्या राहुल गांधी यांच्याच प्रयत्नांची पुनरावृत्ती करून पाहिली. पण त्या फटाक्याचाही फारसा गाजावाजा झालाच नाही. राहुल गांधींच्या फुसक्या फटाक्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आव्हान तरी दिले होते. आदित्य ठाकरे यांनी तोच न वाजलेला फटाका नव्या वातीनिशी पुन्हा वाजविण्याचा प्रयत्न केल्यानंतर निवडणूक आयोगाने तर त्याची दखलही घेतलेली दिसत नाही. या फटाक्याचा स्फोट घडविण्यासाठी आदित्य ठाकरे यांनीदेखील राहुल गांधी यांच्यासारखाच मंच सजवला होता. त्याच पद्धतीचे सादरीकरण करून काकणभर सरस नेपथ्य घडविण्याचा प्रयत्नही केला गेला. पण मतदारयाद्यांतील काही त्रुटींमुळे किंवा यादीतील घोळामुळे मतदानात घोळ असल्याचा छातीठोक दावा मात्र कोणालाच करता आला नाही.rahul gandhi एखाद्या मतदाराचे नाव वेगवेगळ्या याद्यांमध्ये असू शकते, त्याची काही कारणेही असतात. नावांची अशी पुनरावृत्ती होणे योग्य नाही, याबाबत कोणाचेही दुमत नसूनही, दोन वेगवेगळ्या याद्यांमध्ये नाव असलेला मतदार दोन वेळा मतदान करू शकत नाही, ही बाब मात्र गुलदस्त्यात ठेवून मतदारांमध्ये संभ्रम पसरविणारा तो फटाकाही फुसकाच ठरला. मागे एकदा, नवी मुंबईतील एका सभेत खुद्द शरद पवार यांनीच मतदारांना एक सल्ला दिला होता. आपल्या गावी असलेल्या यादीत तुमचे नाव असेल तर गावाकडे मतदान करा, नंतर बोटावरची शाई पुसा आणि पुन्हा मुंबईत मतदान करा, असे त्यांनी भर सभेत सांगितल्यामुळे गोंधळ उडाला. आम आदमी पार्टीने तर, याआधीच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा थेट आरोपही केला. या वक्तव्याच्या चौकशीची चक्रे फिरू लागली तेव्हा पवार यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली. असे दुबार मतदान कसे करता येईल असा प्रश्नही विचारला गेला आणि आपण गमतीने तसे बोललो असे सांगून पवार यांनीच दुबार मतदानाच्या शक्यतेचा इन्कारही केला होता. आज पवारांनी मतदारांना दिलेला तो सल्ला आणि नंतर केलेली ती सारवासारव लक्षात असती तर कोणीही दुबार मतदानाचा कांगावा करत भुई धोपटली नसती.
आदित्य ठाकरे यांचा प्रयोगही राहुल गांधी यांच्या प्रयोगाप्रमाणेच फसला. असा कांगावा लोकांना पटत नाही हे स्पष्ट झाल्यावर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी आता याच मुद्यावर दंड थोपटले आहेत. मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांना एका गहन प्रश्नाने ग्रासलेले आहे. तोच प्रश्न खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही पडला होता आणि त्याचे उत्तर त्यांना कधीच सापडलेही नव्हते. आपल्या सभांना एवढी प्रचंड गर्दी होते, मग मतदानाच्या वेळी हे लोक कोठे जातात, असा प्रश्न त्यांनी सभेला उपस्थित असलेल्या जनतेलाच विचारला होता. तेव्हा तर, राज्यात काँग्रेसच्या झेंड्याखाली सत्ताकारण सुरू होते. बाळासाहेबांना ते कोडे कधीच उलगडले नाहीच, पण त्याच कोड्याचे ओझे पुढे राज ठाकरे यांच्या खांद्यावर येऊन पडले. राज ठाकरे यांच्या सभांनाही प्रचंड गर्दी होते. त्यांच्या भाषणाला टाळ्या, शिट्ट्यांचा गजरही होतो. पण त्यांनाही मते मात्र मिळतच नाहीत. मनसेच्या स्थापनेपासून पुढे या पक्षाला मतांच्या राजकारणात गळतीच लागली आणि त्यांच्यासमोरील हे कोडे अधिकच गूढ होत गेले. अजूनही त्यांना तो प्रश्न पडलेला असल्याने, मतदारयाद्यांच्या घोळाचा धागा पकडून त्याचे उत्तर शोधण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. वस्तुतः, राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी मतदारांच्या मानसिकतेचा किंवा मतदारांच्या अपेक्षांचा फारसा विचार केलेला नसावा, असा त्यांच्या एकूण राजकारणाचा बाज आहे. आपण ठरवू ते धोरण आणि आपण बांधू ते तोरण अशीच त्यांची राजनीती आहे. त्यामुळेच, सत्ता हाती द्या, मी सगळे सुतासारखे सरळ करेन असा दावा करणारे राज ठाकरे सतत तोडफोडीची आणि खळ्ळ खट्याकचीच भाषा करत राहिले. मारझोड, नासधूस, ही त्यांच्या राजकारणाची दिशा अनेकदा स्पष्ट झाली आहे. कोणताही जनहिताचा प्रश्न हाती घेऊन तोदेखील नासधूस, तोडफोडीच्या मार्गाने सोडवावा या विचारावर राज ठाकरेंचा पक्ष ठाम असतो, असे अनेकदा दिसून आले आहे. रस्त्यांवरील टोल आकारणी हा जनतेच्या दृष्टीने संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो राजकीय चातुर्याने हाताळला, तर जनतेचा विश्वास संपादन करणे शक्य होते. पण हा प्रश्नदेखील राज ठाकरे यांच्या पक्षाने खळ्ळ खट्याक नीतीनेच हाताळला आणि या मुद्यावरून लावलेला फटाकाही फुसकाच ठरला. सभेसाठी जमणाèया अलोट गर्दीचे रूपांतर मतदानात का होत नाही, हा बाळासाहेबांना पडलेला प्रश्न राज ठाकरेंना पडला, ते साहजिकही होते. उद्धव ठाकरे यांना मात्र तो प्रश्न पडण्याचे फारसे काही कारणच नसावे. कारण त्यांनी युती आणि आघाडीच्या आधारावरच सत्ताकारण केले. शिवसेनेत फूट पडण्याआधी उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकारणाची दिशा बाळासाहेबांच्या राजनीतीच्या नेमक्या उलट दिशेने फिरवली. भाजपसोबतच्या दीर्घकाळातील युतीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला सत्तेच्या सान्निध्यात राहणे शक्य झाले होते. पुढे भाजपविरोधात कडवट भूमिका घेऊन त्यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी केली, त्यामुळे पुन्हा सत्तेची ऊब मिळतच गेल्याने, मतांच्या बेरजेचा हिशेबही करण्याची गरज त्यांना भासली नसावी. शिवसेनेच्या सभांना होणाèया गर्दीत त्या पक्षाच्या मतदारांचा आकडा घरंगळत चालल्याचे स्पष्ट होऊनही, सत्ता सहजसाध्य होत गेल्याने, उद्धव ठाकरे यांना तो प्रश्न पडला नसावा. आता मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षाला पुरती गळती लागल्यावर कदाचित त्यांना सत्तेची नवी गणिते, नव्या कुबड्या शोधण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या प्रश्नाची पालखी त्यांच्याही खांद्यावर येण्याची चिन्हे दिसू लागल्याने, पुन्हा त्यांच्या गटानेही मतदारयाद्यांच्या घोळाच्या सुतावरून राजकारणातला स्वर्ग गाठण्याचा राहुल गांधी यांचा फुसका फटाका वाजविण्याचा खटाटोप चालविलेला दिसतो.
त्यामुळेच, राजकारणाकडे गांभीर्याने पाहणाऱ्यांना आता त्यात फारसा रस राहिलेला नाही. राजकारण हा करमणुकीचा खेळ वाटावा असे अनेक नवनवे किस्से यात भर टाकत आहेत. सरत्या आठवड्याच्या सुरुवातीस, गेल्या सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचा निर्धार मेळावा मुंबईच्या वरळी डोममध्ये पार पडला.rahul gandhi याच मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी मतदारयादीतील गोंधळाच्या राहुल गांधी यांच्या प्रात्यक्षिकाचा पुढचा प्रयोग सादर केला होता आणि त्यापाठोपाठ राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या मेळाव्यात मतदान यंत्रे घोळ करू शकतात असे लोकांना भासविण्यासाठी काही जादूचे प्रयोगही करून दाखविले होते. सार्वजनिक मंचावर सनसनाटी आरोप करून सरकारविरुद्ध आणि सरकारी यंत्रणांविरुद्ध समाजामध्ये संशयाचे वातावरण निर्माण करण्याची एक सूत्रबद्ध कार्यपद्धती कामाला लागलेली आहे, असा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या त्या फसलेल्या प्रयोगानंतर केला होता. अशा प्रयोगांमुळे आरोप करणाऱ्या नेत्यांच्या प्रतिमेभोवतीच गैरसमज आणि संशयाचे धुके पसरणार असून ते टाळावयाचे असेल तर सज्जड पुराव्यांसह जनतेसमोर जाणे योग्य ठरते, असा सल्लाही त्यांनी त्या वेळी दिला होता. आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या प्रयोगाचीच नक्कल केल्यानंतर फडणवीस यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. महाराष्ट्रात दुसरा पप्पू तयार होऊ नये, असा टोला त्यांनी हाणला होता. सरकार आणि स्वायत्त संस्थांच्या विरोधातील आरोपांची शहानिशा करण्याची एक विहित कार्यपद्धती असते. संविधानाने त्या कार्यपद्धतीचा स्वीकार केलेला आहे. संविधानाची हमी देत या कार्यपद्धतीस नाकारून कोणी नेता बेछूट वक्तव्ये करत असेल, तर त्यातील गांभीर्य नाहीसे होईल, म्हणून, केवळ सुताचा एक धागा पकडून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न म्हणजे राजकारणातील करमणुकीचा प्रयोग ठरतो. तसे होऊ नये यासाठी नेत्यांनी काळजी घ्यायला हवी.