पुण्यात पाच जणांच्या उपस्थितीत रोहित आर्यावर गुप्त अंत्यसंस्कार

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
पुणे,
Rohit Arya's secret funeral मुंबईतील पवई ओलीस नाट्यामधील मुख्य आरोपी रोहित आर्याच्या पार्थिवावर गुपचूप अत्यंस्कार करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर आज (1 नोव्हेंबर 2025 रोजी) पहाटे पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या पाच जणांच्या उपस्थितीत रोहित आर्याच्या अंत्यसंस्काराचे विधी पार पडले. या वेळेस मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
Rohit Arya
 
शुक्रवारी रोहितच्या मृतदेहाचे जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन झाले. त्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. तातडीने रुग्णवाहिकेने मृतदेह पुण्यात नेण्यात आला. रोहित हा पुण्यातच वास्तव्यास असल्याने त्याच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये रोहितच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहितच्या अंत्यसंस्कारावेळी रोहित आर्याची पत्नी, मुलगा, मेव्हणा आणि इतर 2 नातेवाईक उपस्थित होते. पुणे पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात पहाटे अडीच वाजता रोहितच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या रोहितला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याने प्राण सोडल्याचं गुरुवारच्या ओलीस नाट्यानंतर सांगण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी मुंबईतील जे. जे. रुग्णालयामध्ये त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पार पडलं. यावेळेस रोहितच्या छाती आणि पाठीतून गोळी आरपार गेली असल्याची जखम दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे.
पवई ओलीस नाट्य घडवण्यासाठी रोहित आर्याने चित्रपट लेखक, दिग्दर्शक यांची गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून निवड करत हा सुनियोजित कट आखल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आर्याने रोहन आहेरवर मुलांना प्रशिक्षित करून शूटिंगसाठी तयार करण्याची जबाबदारी दिली होती. पोलिसांनी सांगितले की, आर्याने वेब सिरीजसाठी लहान मुलांचे ऑडिशन, अभिनय प्रशिक्षण आणि मालिकेच्या चित्रणामध्ये 'ओलीस नाट्य' हा प्रारंभिक प्रसंग दाखवण्याचा तर्क सांगत विश्वासात घेतले. वेब सिरीजची सुरुवात ओलीस नाट्याच्या प्रसंगाने होईल. त्याचे शूटिंग होईल असे पालक आणि मुलांना सांगितले. चार दिवस रंगीत तालीम सुरू होती. त्याने काही कलाकारांनाही भेटीसाठी बोलावले होते. काही कलाकार घटनेच्या दिवशी जाणार होते. ओलीस नाट्य घडलेल्या स्टुडिओत सीसीटीव्ही होते. मात्र आर्याने स्टुडिओच्या प्रत्येक मार्गावर अद्ययावत सीसीटीव्ही (मुव्हिंग) आणि तसेच प्रत्येक दरवाजाला मोशन सेन्सर बसवून घेतले होते. इतकेच नव्हे त्याने स्टुडिओचे मुख्य प्रवेशद्वार वेल्डिंग करून बंद केले.