संतापजनक...एकाच शाळेतील तब्बल २२ विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
पूर्व सियांग,
Sexual assault on 22 students अरुणाचल प्रदेशातून अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पूर्व सियांग जिल्ह्यातील एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तब्बल २२ विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, शाळेच्या वॉर्डनसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.
 
 
Sexual assault on 22 students
 
या प्रकरणाची सुरुवात २९ ऑक्टोबर रोजी झाली, जेव्हा एका पालकाने आपल्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार मेबो पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत शाळेच्या महिला वॉर्डन हेन जॉन्सन वाफे हिला अटक केली. तिच्यावर पॉक्सो कायद्यानुसार गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, तपासादरम्यान आणखी काही पालकांनी पुढे येत त्यांच्या मुलांवर झालेल्या अत्याचारांची माहिती पोलिसांना दिली, ज्यामुळे प्रकरण अधिकच धक्कादायक व गंभीर बनले.
तपास सुरू असताना असे लक्षात आले की शाळेचे मुख्याध्यापक होनिनू वायफे आणि लेखापाल नियांगडोइटिंग वायफे यांनी ही घटना दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अत्याचाराच्या तक्रारी योग्य वेळी नोंदवण्यास टाळाटाळ केली आणि पालकांना गप्प बसवण्याचा दबाव आणला. परिणामी, पोलिसांनी ३० ऑक्टोबर रोजी या दोघांनाही अटक केली असून त्यांच्यावरही पॉक्सो कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने शाळेत भेट देऊन अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. हे पुरावे सध्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या २२ विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून, बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणानंतर प्रशासनाने शाळा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने पीडित विद्यार्थ्यांना मानसिक आणि वैद्यकीय मदत देण्यासाठी विशेष वैद्यकीय पथक स्थापन केले आहे. संपूर्ण प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे