सिडनी,
Shreyas Iyer discharged from Sydney भारतीय क्रिकेट संघाचा विश्वासू फलंदाज श्रेयस अय्यर आता प्रकृतीच्या अडचणीतून हळूहळू सावरत आहे. सिडनीत झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या गंभीर दुखापतीनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून तो सध्या स्थिर स्थितीत असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. २५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अॅलेक्स कॅरीचा झेल घेण्याच्या प्रयत्नात अय्यर जोरात जमिनीवर कोसळला.

या अपघातात त्याच्या पोटाला जबर दुखापत झाली आणि त्याच्या प्लीहामध्ये रक्तस्त्राव झाल्याचे आढळले. त्वरित वैद्यकीय पथकाने हस्तक्षेप करत त्याला सिडनीतील रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी स्थिती गंभीर असल्याने त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीने दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की, श्रेयसवर सिडनीतील डॉक्टर डॉ. कौरौश हाघीघी यांच्या टीमने आणि भारतातील प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. दिनशॉ पार्डीवाला यांच्या सल्ल्याने उपचार करण्यात आले. अंतर्गत रक्तस्त्राव थांबवण्यासाठी किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याची तब्येत आता समाधानकारक आहे. तो जलद गतीने बरा होत आहे.
संघ व्यवस्थापनाच्या माहितीनुसार, अय्यर सध्या अजून काही दिवस सिडनीमध्येच राहणार आहे. पुढील वैद्यकीय सल्लामसलत पूर्ण झाल्यानंतर आणि डॉक्टरांनी उड्डाणासाठी परवानगी दिल्यानंतरच तो भारतात परतणार आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनास अजून काही काळ लागू शकतो. बीसीसीआयने डॉक्टर आणि रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानत म्हटले आहे की, त्यांच्या तत्परतेमुळे आणि व्यावसायिक उपचारांमुळे अय्यरची तब्येत जलद सुधारत आहे. संघ आणि चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. आता सर्वांच्या नजरा या गोष्टीवर खिळल्या आहेत की श्रेयस अय्यर भारतात नेमका कधी परतणार आणि पुन्हा मैदानावर कधी उतरतो.