नाशिक,
Smart technology at Nashik's Kumbh Mela सिंहस्थ कुंभमेळ्याच्या उलटगणतीला अधिकृत सुरुवात झाली असून, या भव्य धार्मिक सोहळ्याच्या तयारीला आता जोरदार वेग आला आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणासह कुंभमेळ्याचा शुभारंभ होणार असून, त्याआधी सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाने एक अत्याधुनिक ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणाली विकसित केली आहे. या नव्या डिजिटल यंत्रणेमुळे सिंहस्थाशी संबंधित सर्व विकास प्रकल्पांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. म्हणजेच, कोणते काम मंजूर झाले, कधी सुरू झाले, कोणत्या टप्प्यावर पोहोचले आणि पूर्णत्वाला कधी जाईल. या सर्वांचा आढावा अधिकाऱ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे. या प्रणालीचे औपचारिक प्रशिक्षण वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोमवार, ३ नोव्हेंबरपासून दिले जाणार आहे.
संग्रहित फोटो
राज्य शासनाने सर्व कुंभमेळा विकासकामे ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवले आहे. घाट बांधणी, रस्ते आणि महामार्गांचे रुंदीकरण, वाहनतळ, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थापन अशा विविध विभागांची कामे सध्या जोरात सुरू आहेत. मात्र, कामांचा मोठा व्याप आणि मर्यादित कालावधी लक्षात घेता सर्व प्रकल्पांचे एकत्रित निरीक्षण कठीण ठरत होते. त्यावर उपाय म्हणून विभागीय आयुक्त आणि कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या संकल्पनेतून ही ऑनलाइन प्रणाली तयार करण्यात आली आहे.
या प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक यंत्रणेच्या कामांचा प्रगती अहवाल डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहील. मंजुरीपासून पूर्णत्वाचा दाखला मिळेपर्यंत प्रत्येक टप्प्याची नोंद प्रणालीत राहणार आहे. यावर आधारित प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच ठेकेदारांना बिलाचे पेमेंट करण्यात येणार आहे. त्यामुळे कामकाज पारदर्शक, वेगवान आणि जबाबदारीपूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. कुंभमेळ्याशी संबंधित सर्व कामांसाठी विशिष्ट ओळख म्हणून ‘गुलाबी रंग’ आणि ‘कुंभ लोगो’ निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील कोणतेही प्रकल्पस्थळ पाहताच ते सिंहस्थाशी निगडित असल्याचे लगेच ओळखता येईल. पहिल्या टप्प्यात या ऑनलाइन प्रणालीचे लॉगिन अधिकार संबंधित शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना देण्यात येतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ठेकेदार आणि इतर यंत्रणांनाही वापरासाठी स्वतंत्र लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिले जातील. या नव्या तंत्रज्ञानाधारित उपक्रमामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी अधिक कार्यक्षम, नियोजित आणि पारदर्शक पद्धतीने पार पडेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.