चंद्रपूर,
Stamp paper seller-bribe : येथील जलनगर वॉर्ड परिसरातील मुद्रांक पेपर विक्रेता मनिष अरुण देशमुख यास 2 हजार रूपयाच्या मुद्रांक पेपर्सवर 140 रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चंद्रपूर पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून, त्यांना वीज टेंडर कामाकरिता 500 रुपयाचे 3 व 100 रूपयाचे 5 असे एकूण 2 हजार रूपयाच्या मुद्रांक पेपरची आवश्यकता होती. त्यासाठी मुद्रांक पेपर विक्रेत्या मनिष देशमुख याने त्यांच्याकडे प्रत्येक 500 रूपयाच्या मुद्रांक पेपरवर 30 रूपये असे 3 पेपरचे 90 रूपये व प्रत्येक 100 रूपयाच्या मुद्रांक पेपवर 10 रूपये असे 5 पेपरचे 50 रूपये असे एकूण 2 हजार रूपयांच्या मुद्रांक पेपरवर अतिरिक्त 140 रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची आरोपी मनिष देशमुख याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 30 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय येथे तक्रार दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 31 ऑक्टोबरला सापळा रचला. यावेळी मुद्रांक पेपर विक्रेता मनिष देशमुख याने 500 रूपयाचे 3 व 100 रूपयाचे 5 मुद्रांक पेपर असे एकूण 2 हजार रुपयाच्या मुद्रांक पेपरवर 2 हजार रूपये शासकीय शुल्कासह अतिरीक्त 140 रूपये लाच रक्कम असे एकूण 2 हजार 140 रूपये स्वीकारून मदतनीस रूपाली भरतलाल चौधरी हिच्याकडे दिल्याने त्यास रंगेहात पकडण्यात आले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उप अधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक निलेश उरकुडे यांच्या नेतृत्वात पोलिस शिपाई अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, राजेंद्र चौधरी, पुष्पा काचोळे, सतिश सिडाम आदींनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.