वर्धा,
Fraud Case : आधार केंद्र देण्याच्या नावाखाली सर्वसामान्यांना तब्बल १७ लाख ५६ हजारांनी चुना लावणारा महाआयटीचा तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक प्रतीक उमाटे व त्याचा सहकारी शेखर ताकसांडे हे अडीच ते तीन महिन्यांपासून फरार आहेत. वारंवार निवेदन देऊनही या महाठगांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. लाखोंची फसवणूक करणार्यांना कोणाचा आशीर्वाद असा प्रश्न फसवणूक झालेल्यांनी उपस्थित केला.

प्रतीक उमाटे व शेखर ताकसांडे यांनी आधार केंद्र देण्याच्या नावाखाली अनेकांकडून प्रत्येकी ५० हजार ते १ लाख रुपये उकळल्याचे समोर आले होते. याप्रकरणी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये या दोघांनीही १७ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या आदेशान्वये शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्रतीक उमाटे व शेखर ताकसांडे यांची बँक खाती गोठवली तसेच त्यांच्या संपत्तीचीही माहिती गोळा करण्यात आली. कागदपत्रं गोळा करुनही पुढील कार्यवाही होताना दिसत नाही. आता अडीच महिन्यांचा कालावधी झाला तरीही आरोपीपर्यंत पोलिसांना पोहोचता आले नाही.
आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पीडितांसोबतच विविध सामाजिक संघटनांनी पोलिसांना निवेदन दिले. पण, अद्यापही अटक झाली नसल्याने तपासात कुठे अडला असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मास्टरमाइंड प्रतीक उमाटे याने गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये महाआयटीच्या व्यवस्थापक पदाचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात पैसा कमाविला. अनेकांना पैशाच्या जोरावर केंद्र देऊन आयडी एका जागेवर आणि काम दुसर्या जागेवर करणार्यांनाही पैशाच्या लोभातूनच मोकळीक दिली. फसवणुकीचा भंडाफोड झाला. यात बड्या अधिकार्यांचाही समावेश असल्याने गुन्हा दाखल होताच अनेकांचे धाबे दणाणले होते. या दोघांनीही अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज केला. पण, तो फेटाळण्यात आला. तरीही दोघे फरार आहेत.