तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
ramakant-kolte : उत्तम वाङ्मयीन पर्यावरणामुळे वाङ्मयीन व्यवहाराला चालना मिळते. प्रकाशक, वितरक, पुस्तक विक्रते, वाचक यांचे श्रमही वाड्मयीन संस्कृती वाढवण्यात असतातच. ज्या प्रदेशात वाङ्मयीन संस्कृती टिकाव धरते तेथील जनजीवनात जीवनाबद्दल उत्तम समज मूळ धरायला लागतो. मूल्यांचे संस्कार व्हायला अनुकूल भूमी तयार होते. म्हणून वाड्मयीन संस्कृती टिकविण्यासाठी हातभार लावला पाहिजे, असे आवाहन प्रा. डॉ. रमाकांत कोलते यांनी केले.
ते विदर्भ साहित्य संघ शाखा जांब आणि दिग्रस येथील ईश्वर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 69 व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. कोलते बोलत होते. येथील स्मृतीशेष राजानंद गडपायले साहित्यनगरी उबंटू इंग्लिश स्कूल येथे शनिवार, 1 नोव्हेंबरला संमेलनाचे उद्घाटन पार पडले.
यावेळी व्यासपीठावर शेतकरी महिला विद्या मांडगावकर, स्वागताध्यक्ष पांडुरंग खांदवे, पूर्वाध्यक्ष डॉ. वि. स. जोग, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, आमदार बाळासाहेब मांगुळकर, माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे, वैशाली संजय देशमुख, मनोहर शहारे, हेमंत कांबळे यांच्यासह इतरही साहित्यिक उपस्थित होते.
स्वागताध्यक्ष पांडुरंग खांदवे यांनी विचार व्यक्त केले. तर माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा संदेश वाचून दाखविला. याप्रसंगी संबोधताना प्रदीप दाते म्हणाले, येथील विद्येचे अधिष्ठान व शेतकèयांचे कष्ट लक्षात घेता, त्यांच्यापर्यंत संमेलनाच्या माध्यमातून साहित्य पोचले ही अभिमानाची बाब आहे.
यावेली बोलताना डॉ. कोलते म्हणाले, 1921-22 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मध्यप्रदेशातील इंदूर येथे आयोजित केले होते. त्या ठिकाणी मिळालेल्या वागणुकीतूनच विदर्भ साहित्य संमेलनाची पायाभरणी झाली. दादासाहेब खापर्डे आणि लोकनायक बापूजी अणे यांच्या विचारांतून विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन 1929 मध्ये करण्यात आले होते.
त्यानंतर काही वर्षे संमेलन होऊ शकले नाही. परंतु साहित्यिकांनी विदर्भ संमेलनाच्या आयोजनासाठी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. त्यातून साहित्य संमेलन शतकपूर्तीकडे वाटचाल करीत आहे. वाचनाचे महत्व अतिशय आहे. शालेय जीवनातूनच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होणे आवश्यक आहे. लेखक होण्यापूर्वी आधी चांगला वाचक व्हावे आणि मातृभाषेचे संस्कार कधीही विसरू नये, असा संदेश अध्यक्ष डॉ. कोलते यांनी यावेळी दिला.
सर्वप्रथम सकाळी 9 वाजता वा. ना. देशपांडे ग्रंथप्रदर्शनाच्या दालन तसेच कलीम खान ग्रंथ प्रकाशन दालनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रवेशद्वाराचे नाव कविवर्य शंकर बडे प्रवेशद्वार असे देण्यात आले होते. उदघाटन समारंभाचे संचालन मंगला माळवे यांनी केले, तर आभार प्राचार्य शुभांगी बोरखडे यांनी मानले.
साहित्यिकांनी निर्भयपणे पुढे यावे
आरक्षणासाठी जातीजातीत सुरू असलेले शीतयुद्ध कायम राहिले तर वारकरी आणि भारकèयांचा महाराष्ट्र कोसळून पडेल. तेव्हा सर्व साहित्यिकांनी निर्भयपणे पुढे येऊन आवाज बुलंद करावा, असे आवाहन संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. वि. स. जोग यांनी केले. त्यांनी सन्मानपूर्वक डॉ. कोलते यांना संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे सोपविली.
कापसाच्या गाठोड्यात स्मरणिका
ज्ञानाची फुले फुलवणाèया या परिसरातील हिरव्यागार शेताच्या धुèयावर संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण आणि स्मरणिकेचे नाव ‘पांढरं सोनं’ अशी कल्पकता इथे बघायला मिळाली. या स्मरणिकाही विमोचन करण्यासाठी कापसाच्या गाठोड्यातच बांधून आणल्या होत्या, हेही खासच. या देखण्या स्मरणिकेचे संपादन प्राचार्य डॉ. उदय नावलेकर यांच्या नेतृत्वात डॉ. तीर्थराज कापगते, डॉ. ललिता घोडे, मनीष वाढिवे, अपर्णा मारावार व मनोहर शहारे यांनी केले.