वर्धा,
brother-thief : शेतात काम करणार्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत, मंगळसुत्र लांबविणार्या चोरट्या दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदा पाटील (४८) रा. दहेगाव (गोसावी) ही महिला शेतातील पीक पाहून गावाकडे जाणार्या रोडवर उभी होती. दरम्यान, दोन अनोळखी इसमांनी दुचाकीने येत हा रस्ता कुठे जातो, असश विचारले. त्या रस्ता सांगत असतानाच दुचाकीवर मागे बसून असलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून पसार झाले. तर त्याच दिवशी या घटनास्थळापासून ८ ते ९ किमी अंतरावर असलेल्या चारमंडळ शिवारात त्याच दोन अनोळखी इसमांनी माया चाटे (६५) रा. चारमंडळ ता. सेलू यांच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता.
तक्रारीवरून दहेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. तपासादरम्यान, रुपेश राठोड (२४) आणि मुकेश राठोड (२६) दोन्ही रा. मसाळा, ता. सेलू या दोन्ही सख्या भावांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील सोन्याच्या पोत, दुचाकी, मोबाईल असा १ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही चोरट्यांना दहेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद मदन यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी आनंद भस्मे, ब्रह्मानंद मून, भारत सातपुते, अनिल चिलगर यांनी केली.