जिल्ह्यातील खातेदारांची ४३ कोटी परत देण्यासाठी बँकांची विशेष मोहीम

*पहिल्या टप्प्यात १०१ खातेदारांना ९० लाख मंजूर

    दिनांक :01-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
Special Campaign of Banks : जिल्ह्यातील विविध बँकांकडे जमा असलेल्या आणि दहा वर्षांपासून दावा न केलेली रक्कम खातेदारांना परत मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभाग तसेच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या वतीने विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात आज शनिवार १ रोजी १०१ लाभार्थ्यांना ९० लाखांच्या दावा मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले.
 
 
KL
 
मोहिमेंतर्गत बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने नियोजन भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ३४१ खात्यांमध्ये ४३ कोटी १३ लाख इतकी रक्कम दावा न केलेल्या स्वरूपात पडून आहे. यासाठी संबंधित ग्राहकांनी किंवा ग्राहक हयात नसल्यास त्यांच्या वारसदारांनी आवश्यक कागदपत्रासह दावा सादर केल्यास ती रक्कम परत देण्यासाठी बँकांमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत ही विशेष मोहिम राबवण्यात येत आहे.
 
 
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले म्हणाले की, दावा न केलेल्या रकमेची खातेदारांना परतफेड होणे हा उपक्रम संबंधित खातेदारांसाठी किंवा त्यांच्या वारसांसाठी अत्यंत उपयुत आहे. खातेदारांनी प्राप्त रकमेचा योग्य उपयोग करावा आणि भविष्यासाठी त्याची गुंतवणूक करावी. तालुकास्तरावर व गावागावात या उपक्रमाची माहिती पोहोचवण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या. बँकांनी व्हाट्सअ‍ॅप, एसएमएस व अन्य माध्यमातून खातेदारांना मोहिमेची माहिती द्यावी. ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी बँक रेकॉर्डला अद्यावत करावे, जेणेकरून भविष्यात बँकांकडून संपर्क सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले.
 
 
जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक चेतन शिरभाते म्हणाले, ग्राहकाने दोन वर्षापर्यंत व्यवहार न केल्यास खाते निष्क्रिय होते. तसेच दहा वर्ष व्यवहार न केल्यास डीफ होते. त्यामुळे प्रत्येक खातेदाराने आपल्या खात्यात वेळोवेळी व्यवहार करून सक्रीय ठेवावे. तसेच आपल्या डीफ खात्यांची माहिती आपण बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन तसेच आरबीआयच्या पोर्टल वरुन घेवू शकता, असे सांगितले.
यावेळी विविध बँका, वित्तीय संस्था तसेच एलआयसीच्या स्टॉलच्या माध्यमातून ग्राहकांना निष्क्रिय खात्यांविषयी माहिती आणि तत्काळ निवारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच पात्र १०१ लाभार्थ्यांना जवळपास रुपये ९० लाखाच्या विविध बँकाकडून दावा मंजुरी प्रमाणपत्राचे वितरण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.