नवी दिल्ली,
3,300 flights canceled in the US अमेरिकेत सुरू असलेल्या सरकारी बंदामुळे देशभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या बंदाचा फटका आता हवाई प्रवासालाही बसला असून, रविवारी तब्बल ३,३०० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सरकारी निधीअभावी कामकाज ठप्प झाल्याने ट्रम्प प्रशासनावर तीव्र टीका होत आहे. वाहतूक मंत्री शॉन डफी यांनी इशारा दिला आहे की, जर हा सरकारी बंद थँक्सगिव्हिंगपर्यंत कायम राहिला, तर देशातील हवाई वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील ४० प्रमुख विमानतळांवरील उड्डाणांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मोठा व्यत्यय येत असून, प्रवाशांचे हाल होत आहेत. हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले आहेत, अनेकांनी आपली तिकिटे रद्द केली आहेत. या परिस्थितीत बंद संपवण्यासाठी राजकीय चर्चांची प्रक्रिया सुरू झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षातील काही नेत्यांनी आरोग्यसेवा अनुदानाच्या विस्तारावर तडजोडीचा मार्ग स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र त्यांच्या गटातील काही सदस्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सिनेटने सरकारी कामकाजासाठी निधी देणारे तडजोड विधेयक मंजूर केले असून, पुढील टप्प्यात "अफोर्डेबल केअर अॅक्ट" अंतर्गत करसवलतींच्या मुदतवाढीवर मतदान करण्यात आले. यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नेदेखील फेडरल शटडाऊनदरम्यान देशभरातील उड्डाणांमध्ये कपात करण्याचे आदेश दिले आहेत. पगार न मिळाल्यामुळे हवाई वाहतूक नियंत्रकांनी कामावर जाणे बंद केले असल्याने ही पावले उचलण्यात आली. हवाई प्रवासावर लक्ष ठेवणाऱ्या FlightAware वेबसाइटनुसार, रविवारीच जवळपास ७,००० उड्डाणे उशिरा झाली आणि २,१०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. शुक्रवारी १,००० आणि शनिवारी १,५०० उड्डाणे रद्द करण्यात आली होती.
FAA च्या आकडेवारीनुसार, उड्डाणांमध्ये झालेली ही कपात सध्या ४ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे आणि १४ नोव्हेंबरपर्यंत ती १० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही कपात सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत लागू राहणार आहे, ज्याचा परिणाम सर्व प्रमुख व्यावसायिक विमान कंपन्यांवर होईल. वाहतूक मंत्री शॉन डफी यांनी इशारा दिला की, जर सरकारी बंद दीर्घकाळ चालू राहिला तर देशातील हवाई वाहतूक २० टक्क्यांपर्यंत कमी करावी लागू शकते. सलग दुसऱ्या वर्षी वेतन न मिळाल्यास नियंत्रक आणि विमानतळ कर्मचारी काम बंद ठेवण्याची शक्यता असून, यामुळे अमेरिकेतील प्रवासी व्यवस्था जवळजवळ ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे.