मुंबई,
Ajinkya Naik as President मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अजिंक्य नाईक यांचा मार्ग मोकळा झाला आणि ते पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवडले गेले. या निवडीसह आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार या पदांसाठी निवडणूक होणार आहे.

अध्यक्षपदासाठी अर्ज करणारे जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर, शाह आलम शेख, डायना एडलजी, विहंग सरनाईक आणि सूरज सामंत यांनी अर्ज भरला होता; मात्र सर्वांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अजिंक्य नाईक बिनविरोध अध्यक्ष झाले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद तेव्हा अमोल काळे यांचं निधन झाल्यानंतर रिक्त झाले होते, आणि त्यानंतर अजिंक्य नाईक अध्यक्ष झाले होते. 23 जुलै 2024 रोजी ते सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.
उपाध्यक्षपदासाठी डायना एडलजी, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, नवीन शेट्टी, प्रसाद लाड, राजदीपकुमार गुप्ता, शाह आलम शेख, सूरज सामंत आणि विहंग सरनाईक यांनी अर्ज केले होते. त्यापैकी जितेंद्र आव्हाड आणि नवीन शेट्टी यांनी अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे उपाध्यक्षपदासाठी त्यांच्यात थेट सामना होणार आहे. अजिंक्य नाईक यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. शाह आलम शेख यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज मागे घेतला आणि सचिवपदासाठी अर्ज केला आहे. त्यांनी अजिंक्य नाईक यांची उमेदवारी अर्ज भरण्यास अपात्र असल्याचा दावा केला होता, मात्र कोर्टाने हे दावे मान्य केले नाहीत.

