हवामान अलर्ट...महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार!

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Cold weather in Maharashtra महाराष्ट्रातील हवामानात आता स्पष्ट बदल जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी हलकी गारवा आता थंडीच्या स्वरूपात रूपांतरित होत आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील बहुतांश भागांत किमान तापमानात लक्षणीय घट सुरु झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचावाची खबरदारी घ्यावी आणि शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. ऑक्टोबर महिनाभर पावसाचा जोर कायम राहिल्यानंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून हवेत गारवा वाढू लागला आहे. चार दिवसांपूर्वी हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातून दक्षिणेकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. या थंड वाऱ्यांच्या लाटेमुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र तसेच मुंबई आणि परिसरातील तापमानात घट नोंदवली गेली आहे.
 
 
संग्रहित फोटो
 
मुंबईत रविवारी सकाळी किमान तापमान १९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ही थंडी संपूर्ण आठवडाभर कायम राहणार आहे. दिवसा देखील गारवा जाणवू लागल्याने मुंबईकरांनी रविवारी थंडीचा आनंद घेतला. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर अहिल्या नगर या सहा जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी कमी नोंदवले जाणार आहे. विदर्भात देखील तापमान दोन अंशांनी खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या शनिवारपर्यंत राज्यात सर्वत्र सुखद थंडीचा अनुभव मिळणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे आणि थंड राहणार आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर येथे किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्यामुळे थंडीचा प्रभाव सर्वाधिक जाणवणार आहे.
 
 
दरम्यान, मध्य प्रदेश आणि त्याच्या आसपासच्या भागात येत्या काही दिवसांत थंड वाऱ्यांची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर-मध्य महाराष्ट्रातील तापमान आणखी घसरणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांत रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. सध्या राज्यातील बहुतांश शहरांमध्ये किमान तापमान १५ ते १८ अंशांच्या दरम्यान असून मुंबईत ते १९ अंशांपर्यंत खाली आले आहे. शुक्रवारपर्यंत ही थंडी टिकेल आणि त्यानंतर तापमान किंचित वाढले तरी गारवा कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.