राम जन्मभूमीवर २५ नोव्हेंबरला ऐतिहासिक ध्वजारोहण!

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
अयोध्या,
Flag hoisting at Ram Janmabhoomi श्रीराम जन्मभूमीवरील भव्य राम मंदिराचे बांधकाम आता पूर्णत्वास आले असून, या ऐतिहासिक कार्याची औपचारिक घोषणा २५ नोव्हेंबर रोजी ध्वजारोहण समारंभाने केली जाणार आहे. या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहून राम मंदिराच्या १६१ फूट उंच मुख्य शिखरासह सात पूरक मंदिरांच्या शिखरांवर भगवा ध्वज फडकावतील. या दिवशी अयोध्या नगरी भगव्या रंगात न्हाऊन निघणार आहे. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह हजारो मान्यवर, संत-महंत आणि भाविक उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा देशभरातील हिंदू समाजासाठी श्रद्धा आणि अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
 
 
Ram Temple
 
राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या हस्ते फडकवला जाणारा भगवा ध्वज २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद असेल. या ध्वजावर वाल्मिकी रामायणात वर्णन केलेल्या रघुवंश राजघराण्याची प्रतीके, सूर्य, ओम आणि कोविदार वृक्षाचे चिन्ह अंकित असतील. हा ध्वज ४२ फूट उंच ध्वजस्तंभावर स्थापित केला जाणार असून, त्यामध्ये ३६० अंश फिरणारा विशेष कक्ष बसविण्यात आला आहे जो ताशी ६० किलोमीटर वेगाच्या वाऱ्याचा वेग सहज सहन करू शकेल.
 
 
राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, या समारंभात सुमारे सात ते आठ हजार भाविक सहभागी होणार असून, त्यामध्ये देशभरातील प्रमुख संत-महंत, विविध पंथांचे धार्मिक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचा समावेश असेल. २१ ते २५ नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत मंदिर परिसरात वैदिक विधी पार पडणार आहेत. या विधींमध्ये रामचरितमानसाचे अखंड पठण, श्रीराम रक्षा स्तोत्राचे पठण तसेच भव्य वैदिक हवनाचा समावेश असेल. हे सर्व विधी काशीचे प्रसिद्ध विद्वान गणेशेश्वर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली अयोध्या, काशी आणि दक्षिण भारतातील १०८ आचार्य पार पाडतील.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगमन मार्ग ‘आदिगुरू शंकराचार्य गेट’मार्गे निश्चित करण्यात आला आहे. ते प्रथम हनुमानगढी मंदिरात दर्शन घेतील आणि नंतर रामजन्मभूमी संकुलात प्रवेश करतील. मंदिर परिसरात ते सप्त मंडप तसेच रामायणावर आधारित ३डी भित्तिचित्रांचे निरीक्षण करतील. दरम्यान, रामजन्मभूमी मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी रविवारी मंदिर परिसराची पाहणी करून ध्वजारोहण समारंभाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी बांधकाम संस्थांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. २५ नोव्हेंबर रोजीचा हा ध्वजारोहण सोहळा केवळ अयोध्येपुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण निर्माण करणार असून, राममंदिराच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल.