सांगलीत अग्नीतांडव...एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी अंत

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
सांगली,
Four killed in fire in Sangli सांगली जिल्ह्यातील विटा शहर आज सकाळी भीषण आगीच्या तांडवाने हादरले. सावरकरनगर परिसरातील विष्णू जोशी यांच्या “जय हनुमान स्टील सेंटर” या भांड्याच्या दुकानाला साडेआठ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दुकानमालक विष्णू पांडुरंग जोशी (४७), त्यांची पत्नी सुनंदा जोशी (४२), मुलगी प्रियांका योगेश इंगळे (२५) आणि दोन वर्षांची नात सृष्टी योगेश इंगळे यांचा समावेश आहे. या भीषण घटनेने विटा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
 
Four killed in fire in Sangli
 
प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते. विष्णू जोशी यांचे “जय हनुमान स्टील सेंटर” हे दुकान त्यांच्या स्वतःच्या तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर होते, तर वरील मजल्यांवर जोशी कुटुंब राहत होते. सकाळी अचानक दुकानाच्या शटरमधून धूर निघताना पाहून स्थानिकांनी आरडाओरड केली. काहींनी स्वतःच्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.
 
 
विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला आणि नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबातील सहा सदस्य अडकले होते. घरं एकमेकांना चिटकून असल्याने बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला. दरम्यान, कडेगाव नगरपंचायत, कुंडल कारखाना, उदगिरी कारखाना, पलूस आणि तासगाव नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न केले. अखेर दीर्घ प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले, मात्र तोपर्यंत जोशी कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. या दुर्घटनेने विटा शहरात शोककळा पसरली असून प्रशासनाने घटनेचा तपास सुरू केला आहे.