आणि रवींद्र जडेजाचे इंस्टाग्राम अकाउंट झाले गायब!

    दिनांक :10-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Ravindra Jadeja's Instagram account स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कारण त्याचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाले आहे. त्यामुळे तो चेन्नई सुपर किंग्ज सोडणार का, अशी अटकळ क्रिकेटप्रेमींमध्ये जोर धरू लागली आहे. आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी ही चर्चा आणखी तापली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा मिनी लिलाव १५ डिसेंबरला होणार असून, त्याआधी सर्व संघांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आपली रिटेन्शन लिस्ट सादर करायची आहे. या पार्श्वभूमीवर, जडेजाचे सोशल मीडियावरून अचानक गायब होणे चाहत्यांना गोंधळात टाकणारेठरले आहे.
 
 
Ravindra Jadeja
सोमवारी त्याचे अधिकृत वापरकर्तानाव “royalnavghan” हे इंस्टाग्रामवरून दिसेनासे झाले. त्याची प्रोफाइल लिंक देखील तुटलेली आहे. जडेजाने स्वतः अकाउंट निष्क्रिय केले का, की काही तांत्रिक कारण आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, यामुळे त्याच्या CSK मधील भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याचवेळी, क्रिकेट वर्तुळात अशीही चर्चा आहे की चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मोठ्या देवाणघेवाणीचा व्यवहार घडू शकतो. या चर्चेनुसार, CSK कडून रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांची देवाणघेवाण करून राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन चेन्नईत दाखल होऊ शकतो.
 
 
मनोरंजक बाब म्हणजे, रवींद्र जडेजाचा पहिला आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सच होता. तो २००८ साली केवळ १९ वर्षांचा असताना राजस्थानकडून खेळला आणि पहिल्याच हंगामात संघाने विजेतेपद पटकावले होते. नंतर २०१० मध्ये करार नियमांचे उल्लंघन केल्याने त्याला एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. २०१२ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला आणि त्यानंतर CSK च्या पाच विजेतेपदांपैकी तीनमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. २०२२ मध्ये त्याला चेन्नईचा कर्णधार करण्यात आले, परंतु खराब कामगिरीमुळे त्याने हंगामाच्या मध्यातच पद सोडले. तरीही, CSK ने त्याच्यावर विश्वास ठेवत २०२५ हंगामासाठी त्याला १८ कोटी रुपयांना कायम ठेवले.
 
आतापर्यंत जडेजाने आयपीएलमध्ये २५४ सामने खेळले असून, ३,२६० धावा आणि १७० विकेट्स घेतल्या आहेत. CSK साठी तो ड्वेन ब्राव्होनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे (१५२ विकेट्स). विशेष म्हणजे, २०२३ च्या आयपीएल फायनलमध्ये जडेजाने शेवटच्या षटकात धडाकेबाज फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला होता. आता त्याचे इंस्टाग्राम अकाउंट गायब झाल्यामुळे, तो पुन्हा राजस्थान रॉयल्सकडे वळणार का याबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले आहे. जडेजाने यापूर्वी गुजरात लायन्स, कोची टस्कर्स केरळ आणि राजस्थान रॉयल्ससाठी खेळले आहे. पुढील हंगामात तो पुन्हा राजस्थानच्या रंगात दिसेल का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.