फरीदाबाद,
Seven arrested including doctor and cleric दिल्लीपासून काही किलोमीटर अंतरावर हरियाणाच्या फरीदाबाद आणि उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आला आहे. जम्मू-काश्मीर पोलिस आणि हरियाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आला असून, सात जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ३६० किलो स्फोटके, दारूगोळा आणि दोन रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
तपासानुसार, अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये अनेक सुशिक्षित तरुण आणि वैद्यकीय व्यावसायिकांचा समावेश आहे, जे देशात दहशत निर्माण करण्याचा कट रचत होते. अटक केलेल्या सात व्यक्तींमध्ये कुलगामचे रहिवासी व अनंतनाग GMC चे वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. आदिल अहमद दार यांचा समावेश आहे; त्याला २७ ऑक्टोबर रोजी सहारनपूरमध्ये अटक करण्यात आली होती. याशिवाय, पुलवामाचा रहिवासी आणि फरीदाबादमधील अलसफा विद्यापीठात वैद्यकीय विद्यार्थी डॉ. मुझम्मिल शकील यालाही सुमारे १० दिवसांपूर्वी अटक करण्यात आली.
या नेटवर्कमध्ये शोपियान येथील मौलवी इरफान अहमद, श्रीनगरचे मकसूद अहमद दार, आरिफ निसार दार, यासिर उल अश्रफ आणि गंदरबल येथील जमीर अहमद अहंगर यांचा समावेश आहे. पोलिसांनी एका महिला डॉक्टरच्या कारमधून एक असॉल्ट रायफल, एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केले असून, ही कार डॉ. मुझम्मिल शकील यांच्या सहकाऱ्याच्या नावावर नोंदणीकृत आहे. या प्रकरणात त्या महिला डॉक्टरचीही सविस्तर चौकशी सुरू आहे.
जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये १ असॉल्ट रायफल (एके-४७ सारखी, थोडी लहान), ३ मॅगझिन आणि ८३ जिवंत काडतुसे, १ पिस्तूल, ८ जिवंत काडतुसे, २ रिकामे काडतुसे आणि २ मॅगझिन, ८ मोठे सूटकेस आणि ४ लहान सूटकेस, १ बादली, ३६० किलो ज्वलनशील पदार्थ (संशयास्पद अमोनियम नायट्रेट), २० टायमर, ४ बॅटरीवर चालणारे टाइमर, २४ रिमोट, ५ किलो हेवी मेटल, वॉकी-टॉकी सेट, इलेक्ट्रिकल वायरिंग आणि वायरिंग हार्नेस याचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की ही कारवाई देशातील दहशतवाद प्रतिबंधक यंत्रणेसाठी मोठ्या धक्क्याची ठरली आहे आणि अटक केलेले आरोपी दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचे समोर आले आहे.