बीड,
Threat to Maratha protestor मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी गंगाधर काळकुटे यांना गंभीर जीवघेणी धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही धमकी बीड जिल्ह्यातील परळी परिसरात दिली गेली असून, धमकी देणारा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा कथित समर्थक असल्याचे बोलले जात आहे. धमकीचा ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गंगाधर काळकुटे यांना पैलवान सतीश नावाच्या व्यक्तीने फोन करून धमकी दिली. धमकी देणाऱ्याने काळकुटेंना उद्देशून म्हटले, संतोष भैय्यानंतर दुसरा नंबर तुझाच होता. तसेच, काळकुटे यांना धनंजय मुंडे यांच्या परळीतील जगमित्र कार्यालयात एकटे येण्याचे आव्हानही दिले. ऑडिओ कॉलमध्ये ऐकू येते की, ही धमकी धनंजय मुंडे यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि त्यांना बदनाम करण्यासाठी देण्यात आली आहे.
गंगाधर काळकुटे हे बीड येथील मराठा समाजाचे समन्वयक आहेत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे खांद्याचे समर्थक मानले जातात. गेल्या २५ वर्षांपासून ते मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीत सक्रिय आहेत. ते राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष असून, याआधी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज भरला होता. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका बदलल्यानंतर गंगाधर काळकुटे यांनी अर्ज मागे घेतला, अशी माहिती त्यांनी दिली होती. धनंजय मुंडे यांनी देखील गंगाधर काळकुटे हे जुने मित्र असल्याचा उल्लेख केला आहे. ही धमकी मराठा समाजात तणाव निर्माण करणारी घटना मानली जात असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेत तपास सुरु केला आहे.