वर्धा,
Wardha Municipal Council Election, जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून सर्व नगरपरिषदांमध्ये गर्दी दिसून आली आहे. चार वर्षांत पहिल्यांदाच नगरपरिषद कार्यालयात असे दृश्य पाहायला मिळाले आहे.
वर्धा नगरपरिषदेत नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासनाने व्यवस्था केली आहे. शहरातील २० वॉर्डमधून ४० नगरसेवकांची निवड होणार आहे. यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पाच वॉर्डांसाठी चार काउंटर लावले आहेत. याव्यतिरित, नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र काउंटर उभारण्यात आले आहे. आवश्यक मार्गदर्शन दिल्यानंतर सदस्यपदासाठी नामांकन स्वीकारले जाईल. चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. यामुळे नगरपरिषद कार्यालय पूर्वीसारखेच चैतन्य आले आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस विभागाकडून कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वर्धा नगरपरिषदेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपविभागीय दंडाधिकारी गणेश खताळ यांची नियुती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी विजय देशमुख आणि उपमुख्याधिकारी अभिजित मोटघरे काम सांभाळत आहेत. निवडणूक लढण्यासाठी मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. अनेक इच्छुकांनी अद्याप कर भरलेला नाही. ते कर भरण्यासाठी गर्दी करीत आहेत.