वर्ग सात, विद्यार्थी 124 अन् शिक्षक ‘एक’

राजोली येथील जि. प. शाळेतील प्रकार

    दिनांक :11-Nov-2025
Total Views |
अर्जुनी मोर, 
District P. School in Rajoli प्रत्येक बालकाला शिक्षण मिळावे म्हणून सक्तीचा शिक्षणा कायदा अंमलात आणला. कायद्यानुसार आवश्यक विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक व इतर सुविधा शाळेत असणे अपेक्षित आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांत विद्यार्थी संख्येनेरुप शिक्षक नाहीत. तालुक्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त राजोली भरनोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून 124 विद्यार्थी प्रवेशित आहेत. या शाळेत एकच शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत आहे. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले जाते.
 
 

विद्यार्थी 124 अन् शिक्षक ‘एक 
 
मात्र शिक्षणापासून वंचीत राहण्याची वेळ राजोली भरनोली येथील विद्यार्थ्यांवर शिक्षकाअभावी आली आहे. एका वर्गात वर्णमाला, दुसर्‍यात पाढे तर तिसर्‍यात इतिहास; अशा बहुवर्गीय गोंधळात एकट्या गुरूजीची कसरत सुरू आहे. गाव अतिदुर्गम असल्याने शिक्षक येथे रुजू होण्यास टाळाटाळ करतात. प्रशासन व पदाधिकारी लवकरच शिक्षकांची नेमणूक होईल, असे आश्वासनांचे गाजर देत आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी आहे! आमच्या लेकरांना शिकवायला दुसरा गुरुजी मिळणार की नाही? असा प्रश्न पालकांना पडला आहे. शिक्षकाअभवी गावातील पोलिस पाटीलांना शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकविण्याची वेळ आली आहे. राजोली येथील शाळा शिक्षकविहीन नाही, तर शासन व प्रशासनाच्या उदासीनतेचा जिवंत नमुना असल्याची खंत व्यक्त होत आहे!
 
 
अन्यथा शाळेला कुलूप लावू
राजोली येथील शाळेत शिक्षक द्यावे यासाठी शिक्षण विभाग व पदाधिकारी यांना वारंवार निवेदने दिली. मात्र या निवेदनाकडे दुर्लक्षच केले गेले. आता पालक, शाळाव्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आठवडाभरात शाळेला शिक्षक न दिल्यास कुलूप ठोकण्याचा इशाराच शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार यांना दिलेल्या निवेदनून दिला आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष योगराज औरासे, उपाध्यक्ष नाझीमा सय्यद, शिवदास कोवे, अश्मीना गायकवाड, कविता नाकाडे, रसिका राऊत, राजू नाकाडे, भुनेश्वर गायकवाड, नारायण नाईक, गणेश चौधरी आदी उपस्थित होते.