अयोध्या आणि वाराणसी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर !

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
लखनऊ,
Ayodhya and Varanasi news दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या आणि वाराणसी ही ठिकाणे त्यांच्या हिटलिस्टवर होती, असे तपास यंत्रणांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक दहशतवादी शाहीनने अयोध्येत स्लीपर मॉड्यूल सक्रिय केले होते आणि तेथील धार्मिक स्थळांवर स्फोट घडवून आणण्याची योजना आखली होती. तथापि, पोलिसांनी वेळेत कारवाई करत स्फोटके जप्त केली आणि आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सूत्रांनी सांगितले.

Ayodhya and Varanasi news
दरम्यान, चौकशीत असेही स्पष्ट झाले आहे की, दहशतवाद्यांचे मॉड्यूल विशेषतः मंदिरे, रुग्णालये आणि गर्दीची ठिकाणे यांना लक्ष्य करत होते. ते जास्तीत जास्त जीवितहानी घडवून आणण्यासाठी रुग्णालयांना प्रमुख ठिकाण म्हणून निवडण्याचा विचार करत होते. स्फोटकांमध्ये कोणताही टायमर किंवा प्रगत उपकरण वापरले गेले नव्हते, तर अत्यंत घाईघाईत स्फोट घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरच्या संध्याकाळी सातच्या सुमारास झालेल्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या भीषण घटनेत अनेक वाहनेही उद्ध्वस्त झाली. स्फोटानंतर देशभरात छापेमारी सुरू करण्यात आली असून, अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
 
 
 
या दहशतवादी कटामागील तिघे मुख्य संशयित डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल अहमद दार आणि डॉ. उमर असल्याचे तपासात उघड झाले आहे. स्फोटाच्या वेळी डॉ. उमर ठार झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, उर्वरित दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तपास यंत्रणांकडून या प्रकरणातील आंतरराष्ट्रीय कनेक्शनची सखोल चौकशी सुरू आहे.