महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता सीईटी परीक्षा वर्षातून दोनदा

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
मुंबई,
CET exam twice a year विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडूनआगामी शैक्षणिक वर्षापासून सीईटी परीक्षा आता वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि व्यवस्थापनया अभ्यासक्रमांसाठीच्या सीईटी परीक्षा अनुक्रमे एप्रिल २०२६ आणि मे २०२६ मध्ये दोन सत्रांमध्ये पार पडतील.
 
 
CET exam twice a year
या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, तसेच विभागाचे उपसचिव अशोक मांडे आणि प्रताप लुबाळ उपस्थित होते. देशपातळीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) घेण्यात येणाऱ्या जेईई मेन परीक्षेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आता विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी दोन संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक तयारीसाठी वेळ मिळणार असून, त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची संधी देखील मिळेल.
 
महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा देणे बंधनकारक असेल, तर दुसरी परीक्षा ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने दोन्ही परीक्षा दिल्या, तर त्याच्या दोन्ही परीक्षांमधील ज्या परीक्षेत जास्त गुण असतील, ती गुणसंख्या प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाईल. या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, प्रवेश परीक्षांमध्ये अधिक पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता वाढेल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.