चिखली,
chikhali-municipal-tax-collection : नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखली पालिकेच्या करवसुलीला अचानक मोठी गती मिळाली आहे. नगराध्यक्ष पदासह १४ प्रभागांतील २८ नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासाठी आवश्यक 'थकबाकी नसल्याचा दाखला' मिळवण्यासाठी तातडीने थकीत कर जमा केल्यामुळे पालिकेच्या तिजोरीत २० लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे.
या अनपेक्षित वाढीमुळे नगरपरिषदेकडील थकीत करवसुलीची मोहीम प्रभावी ठरली आहे. नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत बिडगर यांनी तरुण भारतशी बोलताना ही माहिती दिली. त्यामुळे चिखली पालिकेसाठी ही निवडणूक 'हातभार' ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
आता केवळ पाचच दिवस शिल्लक असल्याने इच्छुक उमेदवारांची कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ सुरू आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी खालील दाखल्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे:
* नगरपरिषदेकडून थकबाकी नसल्याचा दाखला
* वैयक्तिक शौचालय व वापराचा दाखला
* नगरपरिषदेचा कंत्राटदार नसल्याचा दाखला
* मागासवर्ग, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी जातवैधता प्रमाणपत्र किंवा पडताळणी समितीकडील टोकन
* "निवडणूक जाहीर होताच इच्छुकांनी त्यांच्याकडील शासकीय थकबाकी एकरकमी भरल्याने पालिकेची करवसुली चांगली झाली आहे. गेल्या काही दिवसातच पालिकेच्या तिजोरीत २० लाख रूपयांपेक्षा जास्त रकमेची भर पडली आहे."
प्रशांत बिडगर, मुख्याधिकारी, न. प. चिखली
निवडणुकीच्या निमित्ताने का होईना, पालिकेच्या तिजोरीत भर पडल्याने विकासकामांना गती मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.