दिल्ली स्फोट आणि व्हाईट कॉलर्ड दहशतवादी

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
 अग्रलेख
 
 
delhi blasts भारतासारख्या खंडप्राय देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सोमवारी (दि. 10 नोव्हेंबर) संध्याकाळच्या वर्दळीच्या वेळी एका कारमध्ये स्फोट झाला. त्यात आठ-दहा माणसांचा बळी गेला. बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ते पारंपरिक बॉम्बचे स्फोट होते काय आणि ते दहशतवाद्यांनीच घडविले आहेत काय, या दोन्ही प्रश्नांची स्पष्ट व निःसंदिग्ध उत्तरे आतापर्यंत मिळालेली नसली तरी या घटनेचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा निष्कर्ष काढण्याइतपत प्राथमिक पुरावे समोर आलेले आहेत. या घटनेचा संबंध उच्चशिक्षित अशा माथेफिरू व्यावसायिकांशी अर्थात व्हाईट कॉलर्ड टेररिझमशी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाच हा फिदायिन हल्ला असावा, असेही तपास यंत्रणांमधील काही लोकांना वाटते. सकृद्दर्शनी या स्फोटाशी उच्चशिक्षित कट्टरपंथीयांचा संबंध असल्याचे दिसते आहे आणि तोच खरा चिंतेचा विषय आहे. घटनेच्या आधी व नंतर काही डॉक्टरांसह संशयितांना झालेली अटक यासंदर्भातून पाहिली पाहिजे. हा स्फोट एका आय-ट्वेंटी कारमध्ये झाला आणि त्या स्फोटामुळे आजूबाजूच्या काही गाड्या व व्यक्ती यांनाही बाधित केले. आतापर्यंतचा तपास असे सांगतो की, ही कार सकाळी दिल्लीत आली आणि संध्याकाळी त्यामध्ये स्फोट झाला.
 
 

दिल्ली ब्लास्ट  
 
 
लाल किल्ल्याच्या परिसरात ही कार तीनेक तास उभी होती. या कारमध्ये बसलेली व्यक्ती डॉक्टर होती, तिने मास्क धारण केलेला होता आणि तिचा संबंध पुलवामाशी होता, अशा बातम्या आल्या आहेत. या कारची खरेदी फरिदाबादमध्ये झालेली असली तरी एकाकडून दुसऱ्याकडे विकली जात असताना तिचा संबंध वेगवेगळ्या राज्यांतील व्यक्तींशी आला होता. एकुणात ही सारी माहिती या घटनेमागील दहशतवाद्यांच्या, मग ते बंदूकवाले-बॉम्बवाले असतील किंवा सभ्य समाजात वावरणारे व्यावसायिक अर्थात व्हाईट कॉलर्ड लोक असतील, सहभागाकडे अंगुलिनिर्देश करणारी आहे. ही घटना दिल्लीत घडल्यामुळे व त्यात व्हाईट कॉलर्ड लोकांचा सहभाग असल्याचे दिसत असल्याने तिचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
कोणत्याही देशाची राजधानी म्हणजे केवळ एक शहर नसते. ते त्या देशाच्या आत्म्याचे, शक्तीचे आणि सत्तेचे केंद्र असते. राजधानी दिल्लीत घडलेली छोटीशी घटना सुद्धा सुदूर दक्षिण भारतात किंवा ईशान्येत अस्वस्थता निर्माण करणारी असते. ही घटना ज्या परिसरात घडली, तो लाल किल्ल्याचा परिसर ही भारताच्या सार्वभौमत्वाची आणि स्वातंत्र्याची निरंतर ग्वाही देणारा परिसर आहे. कारण तेथून दरवर्षी पंतप्रधान स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर देशाला संबोधित करतात. तेथूनच देशाला नवी दिशा देणारी निवेदने करतात. दिल्लीत देशाची संसद आहे. सर्वोच्च न्यायालय आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह आपल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक व्यवस्थेचे सर्व कर्णधार या शहरात असतात. त्यामुळे या शहरातील कोणत्याही घटनेला गांभीर्यानेच घ्यावे लागते. या घटनेचा प्राथमिक तपास दहशतवादी संघटना आणि काही उच्चशिक्षित व्यक्तींपर्यंत घेऊन जाणारा असला तरी पारंपरिक दहशतवादी हल्ल्याचे स्वरूप या घटनेला नाही. मात्र, हे स्फोट व्यावसायिक वर्दळीच्या भागात आणि गर्दीच्या वेळी झाले. त्यामुळे या परिसराची निवड जाणीवपूर्वक केली गेली असावी, असे म्हणण्यास वाव आहे. अशा घटनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण करण्याचा जो दहशतवाद्यांचा हेतू असतो, तो तसा येथेही असल्याचे दिसते. जे काही घडले ते आपसूक किंवा अचानक किंवा घडलेले आहे, असे म्हणण्यास वाव दिसत नाही. जे काही घडले आहे, ते कुणाकडून तरी घडविलेच गेलेले आहे, असे म्हणण्यासारखे पुरावे समोर येत आहेत. गुजरातमध्ये रिसिन नावाचा विषाक्त पदार्थ वापरून नरसंहार घडविणाèयांना आपल्या एटीएसने पकडल्याची पृष्ठभूमी या घटनेला आहे. शिवाय, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पोलिस यंत्रणांनी शेकडो किलो स्फोटके जप्त केली आणि जैश-ए-मोहम्मद व अन्सार गझवात उल हिंद आणि अन् दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या आठ जणांना अटक केली आहे. दिल्लीच्या स्फोटानंतर हे अटकसत्र अधिक वेगाने सुरू झाले. त्यातही डॉक्टर्स आहेतच. यातील काहींचा संबंध तर थेट लष्कर-ए-तैयबाशी असल्याचे सांगितले जात आहे. वरकरणी दहशतवादी किंवा माथेफिरू न वाटणाऱ्या लोकांबद्दल संशय वाटत असल्याने या घटनेत व्हाईट कॉलर्ड दहशतवादाचा संबंध दिसतो. या घटनेचा संबंध पुलवामा हल्ल्याशी जोडला जात असतानाच फरिदाबाद दहशतवादी नेटवर्कचा यात संबंध आहे काय, याचाही छडा लावला जात आहे. बऱ्याच गोष्टी यामागील दहशतवादी अँगलची प्राथमिक पुष्टी करणाऱ्या आहेतच. पहिल्याच दिवशीच्या तपासात अटक केलेले व तपास यंत्रणांच्या रडारवर असलेले अनेक डॉक्टर्स हे कट्टरपंथी असल्याचे निदर्शनास आले आहे. सहारनपूर येथून अटक केलेला अनंतनागचा डॉक्टर, फरिदाबादेत स्फोटके गोळा करणारा डॉक्टर आणि कारमध्ये बसलेला डॉक्टर असे हे कट्टरपंथी डॉक्टर्स. फरिदाबादला अटक केलेल्या महिला डॉक्टरकडे जैश या दहशतवादी संघटनेने भारतात महिला विभाग तयार करण्याची व त्यासाठी भरती करण्याची जबाबदारी सोपविली होती म्हणतात. हे सारे लोक टेलिग्राम नावाच्या अ‍ॅपचा वापर करीत होते. यातला एक डॉक्टर तर मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्याचे निदर्शनास आले आहे. या साऱ्या माहितीचा प्राथमिक अर्थ असा की, इस्लामी कट्टरपंथी हे फक्त अशिक्षित, अल्पशिक्षित असतात असे नव्हे, तर ते उच्चशिक्षितही असू शकतात. किंबहुना इस्लामी कट्टरपंथीयांमध्ये उच्चशिक्षितही आहेत, असा या घटनेचा अर्थ काढता येतो. उच्चशिक्षितांच्या डोक्यातही धर्मांधता किती खोलवर शिरू शकते, याचे हे उदाहरण आहे आणि त्यामुळे ते चिंता वाढविणारे आहे. दहशतवादी संघटनांशी यापूर्वी उच्चशिक्षितांचा संबंध नव्हता, असे नाही. परंतु, आता अशांची संख्या वाढत चाललेली दिसते. या घटनेच्या तपासातून बाहेर येत असलेल्या तथ्यांनी दिल्लीलाच नव्हे तर संपूर्ण देशाला मानसिक धक्का दिला आहे. लोकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना पुन: प्रश्नांकित झालेली आहे. घटना छोटी की मोठी हा मुद्दा नाही. ती कुठे घडली, त्यात कुणाचा सहभाग आहे आणि त्यामागील हेतू काय, हे महत्त्वाचे आहे. एकाचा जीव गेला तरी त्या घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. दहशतवादाची अनेक बीभत्स रूपे भारताने आतापर्यंत पाहिलेली आहेत. सर्व हल्ल्यांमध्ये एक समान सूत्र दिसते. घटनेचे स्थळ बदलेल, स्फोटके बदलतील, पण त्या घटनेतून निर्माण होणारी जनसामान्यांच्या मनातील दहशत सारखीच असते. आता दहशतवादाला उच्चशिक्षित लोकांच्या संबंधांचा ठळक आयाम मिळालेला आहे. एरवी उच्चशिक्षितांवर कुणीही सहज विश्वास ठेवत असतो. अगदी अडाणी माणूस असेल तरी त्याचा विश्वास सर्वांत आधी बसतो तो शिकल्या-सवरल्या माणसावर. त्या विश्वासालाच तडा देणारी ही घटना आहे. इस्लामी कट्टरपंथीयांचे वैशिष्ट्य असे की, त्यांचे शांतता, स्थैर्य, सौहार्दाशी कायम वाकडे असते. ते आपल्याच बिरादरीतल्या लोकांशी सतत भांडत असतात. आखाती देशांमध्ये, आफ्रिकेतल्या देशांमध्ये त्यांची सतत युद्धे सुरू असतात. भारत हा तर त्यांच्या दृष्टीने नावडत्या लोकांचा देश. आमचाच धर्म सर्वोच्च, आमचीच शिकवण सर्वोच्च, आमच्याच चालीरीती उत्तम अशीच शिकवण ज्यांना घरात किंवा त्यांच्या कथित शाळेत मिळत असेल, त्यांना इतरांचे अस्तित्व सहन न होणे स्वाभाविकच. त्यामुळे अर्बन नक्षल्यांसारखे अशा सुटाबुटातल्या दहशतवाद्यांनाही रगडून काढले पाहिजे. केंद्र सरकारने दहशतवाद प्रतिबंधक कायद्याच्या आधारे या मानवतेच्या अपराध्यांना, त्यांच्या म्होरक्यांना आणि त्यांना स्थानिक स्तरावर पाठिंबा देणाऱ्या सर्वांना हुडकून काढले पाहिजे आणि त्यांना कठोरतम शिक्षा दिली पाहिजे. एनआयएने चौकशीची सूत्रे हाती घेतली आहेतच. उत्तर प्रदेश, हरयाणा इत्यादी राज्यांमध्ये धाडसत्रही सुरू झाले आहे. आपल्या तपास यंत्रणांनी या स्फोटाच्या तपासात अधिक परिश्रम घेणे यासाठी अपेक्षित आहे की, गेल्या दशकभराच्या मोदी सरकारच्या काळात निर्माण झालेल्या सुरक्षिततेच्या भावनेला या स्फोटांनी धक्का दिला आहे. आम भारतीय नागरिकांच्या विश्वासाची पुन:प्रतिष्ठा करण्यासाठी सर्व नराधमांना, त्यांच्या कथित व्यवसायाचा विचार न करता, तातडीने शोधून दंडित करणे व पांढरपेशा कट्टरपंथीयांना निरंतर ठेचून संपविणे अत्यंत आवश्यक आहे. अपरिहार्य आहे.