मुस्लिमच दहशतवादी का बनतात?

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रींचे वक्तव्य चर्चेत

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Dhirendra Shastri news दिल्ली बॉम्बस्फोटानंतर बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. दिल्लीतील या भीषण स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शास्त्री यांनी पलवल येथे आयोजित पदयात्रेदरम्यान माध्यमांशी संवाद साधला आणि दहशतवाद व शिक्षण प्रणालीवर भाष्य केले. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, जर भारत खऱ्या अर्थाने हिंदू राष्ट्र बनले आणि सर्व सनातनी एकत्र आले, तर असे हिंसक कृत्य होणार नाहीत. हिंदू धर्माची खरी ओळख म्हणजे वासुदेव कुटुंबकम आणि अहिंसा परमो धर्म. जो खरा सनातनी आहे तो कधीही कोणाचा जीव घेण्याचा विचार करत नाही.
 
 
Dhirendra Shastri news
 
एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पुढे म्हटले की, मुस्लिम दहशतवादी का बनतात, हा प्रश्न संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. मला वाटते त्यांच्या शिक्षण धोरणातच काहीतरी दोष आहे. मदरशांमधील शिक्षणामध्ये मानवतेचे आणि शांततेचे मूल्य शिकवणे अत्यावश्यक आहे. जोवर शिक्षणातून माणुसकी येत नाही, तोवर असे प्रकार घडत राहतील. धीरेंद्र शास्त्री यांची ‘सनातन हिंदू एकता पदयात्रा’ सध्या हरियाणामध्ये सुरू असून, ती दिल्लीहून प्रारंभ झाली आहे. ८ नोव्हेंबर रोजी त्यांनी फरिदाबादमध्ये मोठी सभा घेतली होती, जिथे अंदाजे चार ते पाच लाख भक्त उपस्थित होते. या सभेत त्यांच्या व्यासपीठावरून फरिदाबाद आणि दिल्लीची नावे बदलण्याची मागणीही करण्यात आली होती.
 
मंगळवारी त्यांची पदयात्रा पलवल येथील एका वरिष्ठ माध्यमिक शाळेतून सुरू झाली आणि होडल विधानसभा मतदारसंघातील मित्रोल गावात मुक्काम झाला. या ठिकाणी भजन-कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शास्त्रींनी या ठिकाणी सर्व सनातनींना एकत्र येण्याचे आवाहन केले तसेच यात्रेला विरोध करणाऱ्यांना कडक इशारा दिला. या विधानांमुळे पुन्हा एकदा धर्म, दहशतवाद आणि शिक्षण व्यवस्थेवरील चर्चांना उधाण आले आहे.