सतिश वखरे
हिंगणघाट,
Hinganghat Municipal Council Election हिंगणघाट नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शहरातील २० प्रभागातून ४० उमेदवार मतदारांना निवडून आणायचे आहे. मात्र, निवडणूक रिंगणात उभे राहण्यासाठी उमेदवारांची काही पक्षाजवळ चणचण दिसत असून आघाडी करण्यासाठी ते छोठ्या-मोठ्या पक्षांकडे साकडे घालत असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाजवळ सक्षम उमेदवार मिळत नसल्याने नामुष्कीची वेळ आली आहे. तर दुसरीकडे भाजपा व राकाँ यांच्याकडे एकेका जागेसाठी दोन ते तीन दावेदार असल्यामुळे पक्ष नेतृत्वासमोर संकट निर्माण झालेले आहे. अध्यक्षपदासाठी उबाठाने माजी नगरसेविका निता धोबे यांना तर राकाँ शप गटाने भाजपातून आलेल्या माजी नगरसेविका शुभांगी डोंगरे यांना उमेदवारी दिल्याची जोरदार चर्चा समाजमाध्यमांवर चांगलीच रंगली आहे.
काँग्रेसला प्रभागनिहाय उमेदवारही मिळणे दुरापास्त झाल्याने काँग्रेसची अवस्था या मतदारसंघात किती दयनीय झालेली आहे हे दिसून येत आहे. उबाठा गटाचीही अवस्थाही तशीच आहे. या पक्षाचे राज्यस्तरावरील नेते राणा भीमदेवी थाटात दररोज वेगवेगळ्या वल्गना करीत असताना मात्र या पक्षाजवळ ४० पैकी अर्ध्या जागांवरही उभे करण्यासाठी उमेदवार नाहीत. भाजपा व राकाँ हे दोन पक्ष एकमेकांना आव्हान देत आहेत. भाजपाचे नेतृत्व आमदार समीर कुणावार यांच्या हातात असून राकाँचे नेतृत्व ज्येष्ठ सहकार नेते अॅड. सुधीर कोठारी करीत आहे. या दोन्ही नेत्यांचा जनाधार उत्तम आहे. तिसरीकडे शप गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले हे मागील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी भरपूर मेहनत घेत असून चाळीसही प्रभागात उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, आघाडीतील दोन मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस व उबाठा या दोन्ही मित्र पक्षांना वाटाण्याच्या अक्षदा लावून एकही जागा न देण्याच्या मनस्थितीत दिसत आहेत. यामुळे या निवडणुकीत पुढील संभाव्य चित्र काय असेल, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगलेली आहे.
नप निवडणुकीत शिवसेने सोबत युती न करण्यासाठी राकाँचे जिल्हास्तरीय नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र खुपसरे यांनी केला आहे. उबाठाने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राकाँचे काम केल्याने नपचे अध्यक्षपद उबाठाला द्यावे अशी आमची मागणी होती. त्याप्रमाणे खा. अमर काळे यांच्याशी चर्चा झाली होती. परंतु, आमची मागणी नेतृत्वाने फेटाळून लावल्याने आम्ही काँग्रेस सोबत निवडणूक लढावीत असून या महाआघाडी होऊ न देण्यासाठी राकाँचे नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप खुपसरे यांनी केला आहे.