दिल्ली बॉम्बस्फोटाचे इंटरनॅशनल कनेक्शन...डॉक्टर मॉड्यूलच्या मागे तुर्कीचा हात?

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
International connection of Delhi blast दिल्लीतील कार बॉम्बस्फोटानंतर तपास अधिक गूढ बनत चालला आहे. आता या स्फोटाचा तुर्कीशी थेट संबंध असल्याची शक्यता तपासात पुढे आली आहे. तपास एजन्सींना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी डॉ. मोहम्मद उमर आणि डॉ. मुझम्मिल शकील यांच्या पासपोर्टमधील प्रवासाच्या नोंदींवरून दोघेही काही काळ तुर्कीमध्ये गेले होते. मात्र, पोलिस किंवा कोणत्याही तपास संस्थेने अद्याप याबाबत अधिकृतरीत्या पुष्टी केलेली नाही.
 
International connection of Delhi blast
 
१० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात उमर आय-२० कार चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचे संबंध हरियाणातील फरीदाबाद येथे अटक केलेल्या दहशतवादी मॉड्यूलशी जोडले जात आहेत. एका वृत्तानुसार, वृत्तानुसार, उमर आणि मुझम्मिल यांनी काही टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर लगेचच तुर्कीचा प्रवास केला होता. तिथे त्यांना त्यांच्या “हँडलर” कडून भारतभर “डॉक्टर मॉड्यूल” पसरवण्याचे आदेश देण्यात आले होते. तपासात हेही समोर आले आहे की त्यावेळी फरीदाबाद आणि सहारनपूरसारख्या शहरांना लक्ष करण्याचे निर्देश या दोघांना देण्यात आले होते.
 
अहवालानुसार, तपासकर्त्यांना दोन टेलिग्राम गट सापडले आहेत, ज्याद्वारे डॉक्टर मॉड्यूल तयार करण्यात आले होते. यापैकी एक गट पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा सदस्य उमर बिन खट्टाब चालवत होता. पोलिस आता उमर आणि मुझम्मिल या दोघांनी तुर्कीमध्ये किंवा अन्य देशात कोणत्या हँडलरना भेट घेतली असावी याचा शोध घेत आहेत. दरम्यान, पीटीआयच्या वृत्तानुसार, अटक केलेल्या प्रमुख संशयितांपैकी एक डॉ. मुझम्मिल गनई यांनी यावर्षी जानेवारी महिन्यात लाल किल्ला परिसरात वारंवार हालचाली केल्याचे मोबाईल डेटातून उघड झाले आहे. त्यांच्या फोनमधील टॉवर लोकेशन डेटा आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांनी अनेक वेळा त्या परिसरात भेट दिल्याची खात्री झाली आहे. पोलिसांच्या मते, ही तपासणी २६ जानेवारीच्या सुमारास लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याच्या कटाचा भाग असू शकते, जी त्यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळली गेली.
तपास यंत्रणा आता या मॉड्यूलच्या आर्थिक स्रोतांवर आणि स्फोटक पुरवठ्याच्या मार्गावर लक्ष केंद्रित करत आहे. डॉ. मुझम्मिल आणि डॉ. उमर यांच्या डिजिटल फूटप्रिंट्सचा तपास सुरु असून, त्यांनी कोणत्या व्यक्तींशी संपर्क साधला आणि त्यांना स्थानिक स्तरावर कोणत्या गटांनी सहकार्य केले हे उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व घडामोडींमुळे दिल्ली स्फोट प्रकरण आता फक्त देशांतर्गत कट नसून, आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी जोडलेले असल्याचा ठोस अंदाज तपास संस्थांना आला आहे.