महा ई-सेवा व आधार केंद्र तीन दिवस बंद

-केंद्र चालकांनी पुकारला संप -नागरिकांची कामे ठप्प

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
तिवसा, 
maha-e-sewa-aadhaar-centre : राज्यभरातील महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि आधार सेवा केंद्र चालकांनी शासनाकडे प्रलंबित असलेल्या एकूण २६ विविध मागण्यांसाठी १२ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत तीन दिवसीय संप पुकारला आहे.
 
 
 
j
 
 
 
सदर संपात जिल्ह्यातील सर्व केंद्रांनी एकजुटीने सहभाग नोंदवला असून, संपाच्या काळात सर्व केंद्रे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. या आंदोलनाचे प्रमुख कारण म्हणजे शासनाने १० ऑक्टोबर २०२५ रोजी काढलेल्या नवीन आपले सरकार सेवा केंद्र परिपत्रकातील तांत्रिक व प्रशासनिक विसंगती आहे. शासनाने काढलेले नवीन परिपत्रक अनेक बाबतीत अन्यायकारक असून, केंद्रचालकांच्या हितावर परिणाम करणारे आहे. सदर परिपत्रकाची संपूर्ण तपासणी करून त्यात आवश्यक फेरबदल करण्यात यावेत, अशी मागणी आहे.
 
 
केंद्र चालकांच्या २६ मागण्यांपैकी काही प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत, आधार सेवा केंद्रांना असलेले थकलेले कमिशन त्वरित देण्यात यावे, आधार ऑपरेटरना ब्लॅकलिस्ट करू नये, उलट त्यांना नव्याने प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी, जुन्या झालेल्या व बिघडलेल्या आधार मशिनरीच्या ऐवजी नवीन यंत्रसामग्री देण्यात यावी, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सीडीपीओ, महा आयटी व्यवस्थापक व तांत्रिक व्यवस्थापक यांच्या नियमित नियुक्त्या करून दर तीन वर्षांनी बदल्या करण्यात याव्यात, ग्रामपंचायतींना आपले सरकार आयडी देऊ नये, महा ई-सेवा केंद्र चालकांना नैसर्गिक किंवा आकस्मिक आपत्तीत विमा संरक्षण मिळावे, केंद्र चालकाचा मृत्यू झाल्यास सदर केंद्र त्याच्या कुटुंबीयांना हस्तांतरित करण्यात यावे, राज्यसेतू व जिल्हा सेतू समित्यांमध्ये संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात यावा, राज्य सरकार व केंद्र शासनाच्या सर्व ऑनलाईन योजना महा ऑनलाईन पोर्टलवर सुरु करण्यात याव्यात, महा ऑनलाईन पोर्टलला आधारप्रमाणे बायोमेट्रिक लॉगिन सुविधा उपलब्ध करून द्यावी. या संपामुळे तिवसा तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक शासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे.