नवी दिल्ली
Maulvi Istiak arrest दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या भीषण स्फोटानंतर सुरू असलेल्या तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा सापडला आहे. जम्मू-कश्मीर पोलिसांनी हरियाणातील मेवात परिसरातील मौलवी इस्तियाक याला ‘व्हाईट कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलच्या प्रकरणात अटक केली आहे. हे मॉड्यूल फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठातून चालवले जात होते. पोलिसांनी मौलवी इस्तियाकला श्रीनगर येथे चौकशीसाठी आणले असून, तो अल फलाह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्या घरातून तब्बल २५०० किलो अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फर जप्त करण्यात आले आहेत. ही या प्रकरणातील नववी अटक आहे.
१० नोव्हेंबर रोजी जम्मू-कश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केला होता. हे जाळे प्रतिबंधित संघटनांपैकी जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि अंसार गजवात-उल-हिंदशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. इस्तियाकच्या घरात ठेवलेले स्फोटक साहित्य डॉ. मुझम्मिल गनी उर्फ मुसैब आणि डॉ. उमर नबी यांनी लपवून ठेवले होते. डॉ. उमर नबी हा तोच व्यक्ती आहे ज्याने सोमवारी लाल किल्ल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली कार चालवत आत्मघातकी हल्ला केला. या भीषण स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
मौलाना आझाद Maulvi Istiak arrest मेडिकल कॉलेजच्या शवगृहात आतापर्यंत ८ मृतांची ओळख पटली आहे. ओळख पटलेली सर्व प्रेते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, काहींचा मृत्यू थेट स्फोटाच्या धक्क्याने आणि रक्तस्रावामुळे झाला, तर काहींच्या शरीरावर ‘क्रॉस इंजरी पॅटर्न’ दिसून आला — म्हणजेच स्फोटाच्या लहरींमुळे लोक भिंतींना वा जमिनीवर आपटले. काहींच्या फुफ्फुसांवर, कानांवर आणि अंतर्गत अवयवांवर स्फोटाच्या धक्क्याचा परिणाम झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
ओळख पटलेले मृत
अमर कटारिया (३५), अशोक कुमार (३४), मोहसिन मलिक (३५), दिनेश कुमार मिश्रा (३५), लोकेश अग्रवाल (५२), पंकज सैनी (२३), मोहम्मद नौमान (१९) आणि मोहम्मद जुम्मन (३५).
स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी संपूर्ण शहरात उच्च सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. शहरातील सर्व प्रवेशद्वारांवर तपासणी मोहीम सुरू असून गाझीपूर, सिंघू, टिकरी आणि बदरपूर सीमांवर वरिष्ठ अधिकारी स्वतः उपस्थित राहून देखरेख करत आहेत. बाजारपेठा, मेट्रो स्थानके, बसस्थानके आणि रेल्वे टर्मिनलवर यादृच्छिक तपासणी सुरू आहे. विशेषतः पर्यटनस्थळे, मॉल्स आणि धार्मिक स्थळांवर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची महत्त्वाची बैठक होणार असून, देशातील सुरक्षा स्थिती आणि तपासाचा आढावा घेतला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी साडेपाच वाजता ७ लोक कल्याण मार्ग येथे पार पडेल. यापूर्वी मंगळवारी गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांसोबत चर्चा करून या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडे सुपूर्त केली होती.लाल किल्ला स्फोटानंतर दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये सुरक्षा यंत्रणा अत्यंत सजग असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.